Join us  

बीसीसीआयचा पाकिस्तानला धोबीपछाड; श्रीलंकेच्या खांद्यावर  बंदूक ठेवून केली शिकार!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. त्या जोरावर ते क्रिकेट विश्वात उलथापालथ घडवून आणू शकतात, याची पुन्हा प्रचिती आली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: July 09, 2020 11:24 AM

Open in App
ठळक मुद्देआशिया चषक 2020 रद्द झाल्याचे बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीनं बुधवारी जाहीर केलंयंदाच्या आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानला मिळालं होतं, पण...आयपीएल न होण्यासाठी पीसीबीच्या प्रयत्नांना मोठा धक्का

आशियाई क्रिकेट परिषदेनं घोषणा करण्यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आशिया चषक रद्द झाल्याची घोषणा करावी, यातच सर्व आलं. एका खासजी चॅनलशी बोलताना गांगुलीनं आशिया चषक रद्द झाल्याचे जाहीर केलं. आशिया चषकाची सर्वांना उत्सुकता होती, ती होणं अत्यंत महत्त्वाचं होतं असं काही नाही. भारत-पाकिस्तान सामना होत असल्यानं या स्पर्धेचे महत्त्व. तरीही यंदा ही स्पर्धा पाकिस्तान क्रिकेट मंडळासाठी (पीसीबी) प्रतिष्ठेची होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा खेळवण्याचा आणि इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 13व्या मोसमात खोडा घालण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, बीसीसीआयनं तो हाणून पाडला, अर्थात यात त्यांना श्रीलंका क्रिकेट मंडळाची साथ मिळाली. 

Big News : आशिया चषक 2020 रद्द; सौरव गांगुलीचं मोठं विधान  

कोरोना व्हायरसमुळे सर्वच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांना फटका बसला आणि आयपीएललाही त्याची झळ सोसावी लागली. ऐरवी मार्च ते मे या कालावधीत होणारी स्पर्धा पुढील सूचनेपर्यंत स्थगित करावी लागली. बीसीसीआयनं दोन वेळा तशी घोषणा केली. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. हे नुकसान केवळ एका क्रिकेट संघटनेपुरते मर्यादित नव्हते, तर क्रिकेटपटूंनाही त्याचा आर्थिक फटका बसणार होता. त्यामुळे बीसीसीआय ही स्पर्धा होईल, अशी आशा सोडलेली नाही.

आयपीएलच्या मार्गात दोन प्रमुख अडथळे होते आणि ते म्हणजे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप व आशिया चषक... आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) दोन वेळा बैठक बोलावून ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा निर्णय राखून ठेवला. आसीसीची ही भूमिका बीसीसीआयच्या सहशक्तीचा अंत पाहणारी होती. म्हणूनच दुसऱ्या बैठकीतही काही ठोस निर्णय न झाल्यानं बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी सर्व राज्य संघटनांना आयपीएलच्या तयारीला सुरुवात करण्याच्या सूचना केल्या. बीसीसीआयनं आयपीएलसाठी सप्टेंबर-नोव्हेंबर हा कालावधी ठरवला. पण, याच कालावधीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार असल्यानं, बीसीसीआयला आयसीसीच्या निर्णयाची प्रतीक्षा करणं भाग आहेच. तरीही आयसीसीवर दबाव निर्माण करण्यासाठी बीसीसीआय सातत्यानं आयपीएल होणार यावर ठाम आहेत.

पण, त्यांच्या या मार्गात पीसीबीनं खोडा घालण्याचा प्रयत्न केला. एका स्थानिक लीगसाठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द करणे, योग्य नाही. तसे झाल्यास आम्ही तीव्र विरोध करू.. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप प्रमाणे आशिया चषक रद्द होऊ देणार नाही, अशी गर्जनाच त्यांनी केली. पण, बीसीसीआयच्या श्रीमंतीच्या थाटासमोर कोणाचं चालेलं तर खरं... यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात होणार होता, परंतु बीसीसीआयचा पाकिस्तानात जाण्यास नकार असल्यानं ती स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यास पीसीबी तयार झाले. त्यात त्यांनी श्रीलंकेचा पर्याय डोळ्यासमोर ठेवला. पण, त्याचवेळी संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका यांनी आयपीएल आयोजनाची उत्सुकता दाखवल्यानं पीसीबीची गोची झाली. 

श्रीलंकेत आशिया चषक खेळवणारच, असे ठाम मत पीसीबीनं व्यक्त केलं होतं. पण, आयपीएलमध्ये श्रीलंकेचे अनेक खेळाडू खेळतात आणि आयपीएल न होणं ही खेळाडूंना आर्थिक नुकसान पोहोचवणारे होते. त्यामुळे श्रीलंकेनं ऐनवेळी आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनातून माघार घेतल्याचे, तेथील स्थानिक मीडियानं सांगितलं. श्रीलंका एकाच वेळी एवढ्या खेळाडूंची सोय करू शकत नाही, असे कारण त्यांच्याकडून देण्यात आले. पण, त्याचवेळी आठ संघांच्या आयपीएलसाठी त्यांची उत्सुकता थोडी बुचकळ्यात टाकणारी आहे. बुधवारी गांगुलीनं आशिया चषक रद्द झाल्याची घोषणा करून पीसीबीला धोबीपछाड दिली. श्रीलंकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बीसीसीआयनं पीसीबीची शिकार केली, असा अंदाज चुकीचा ठरणारा नक्कीच नाही.

England vs West Indies 1st Test: वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयएशिया कपपाकिस्तानआयपीएल 2020आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020