दुबई - भारतीय संघाची आशिया चषक स्पर्धेत घोडदौड सुरू आहे. हाँगकाँगवर मात करत भारतीय संघानं सुपर ४ फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभी केली. त्यानंतर गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावत संघाला ४० धावांनी विजय मिळवून दिला. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा एक गोलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरला. हा खेळाडू पाकिस्तानविरुद्धही अपयशी ठरला होता. हा खेळाडू आहे आवेश खान.
पाकिस्तानविरुद्ध खराब कामगिरी करणाऱ्या आवेश खानला दुबळ्या हाँगकाँगविरुद्धही फारशी चमक दाखवता आली नाही. त्याच्या गोलंदाजीवर हाँगकाँगच्या फलंदाजांनी धावांची लयलूट केली. आवेश खानने पाकिस्तानविरुद्ध २ षटकांमध्ये १९ धावा देत एक बळी टिपला होता. तर हाँगकाँगविरुद्ध त्याची गोलंदाजी अधिकच गचाळ झाली. त्याच्या गोलंदाजीवर हाँगकाँगच्या फलंदाजांनी ५० हून अधिक धावा फटकावल्या.
आशिया चषक स्पर्धेमध्ये युवा आवेश खानला सातत्याने संघात संधी दिली जात आहे. मात्र या संधीचा त्याला पहिल्या दोन सामन्यांत फायदा उचलता आलेला नाही. हाँगकाँगच्या नवख्या फलंदाजांनी त्याची पिटाई करत त्याच्या ४ षटकात तब्बल ५३ धावा कुटून काढल्या. यादरम्यान, त्याला एक बळी टिपता आला.
आवेश खानने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला सातत्याने संघात संधी दिली जात होती. मात्र भारतीय संघात समावेश झाल्यापासून त्याला आपल्या कामगिरीची चमक फारशी दाखवता आलेली नाही. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल जखमी झाल्याने आवेश खानला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. आवेश खानने एकूण १५ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याला ९.१० च्या इकॉनॉमीने १३ बळी टिपले आहेत. तसेच आवेश खानने भारताकडून तीन एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.