Asia Cup 2022,India-Pakistan : मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांना जल्लोष साजरा करण्याची संधी टीम इंडियाने रविवारी दिली. वर्ल्ड कपनंतर प्रथमच समोर आलेल्या पाकिस्तान संघाचा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पराभव केला. या विजयाचा जल्लोष कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर पर्यंत रात्रभर सुरू होता. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने हा रोमहर्षक विजय मिळवून आशिया चषक स्पर्धेत गुणखाते उघडले. दरम्यान, या सामन्यातील एका पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
भारत-पाकिस्तान पुन्हा ४ सप्टेंबरला एकमेकांना भिडणार, फायनलमध्येही टक्कर होणार! जाणून घ्या समीकरण
भुवी व आवेश खान यांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर हार्दिकने ३ विकेट्स घेत पाकिस्तानची मधली फळी विस्कळीत करून टाकली. अर्षदीप सिंग व आवेश खान यांनीही धक्के दिले. भुवनेश्वरने ( ४-२६) पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी केली. मोहम्मद रिझवान ( ४३) व इफ्तिखार अहमद ( २८) यांनी डाव सावरला. शाहनवाज दहानीने ६ चेंडूंत १६ धावा करून पाकिस्तानला १४७ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात, लोकेश राहुल पहिल्याच षटकात माघरी परतला. रोहित शर्मा ( १२) व विराट ( ३५) यांनी ४९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर बढती मिळालेल्या जडेजाने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ( १८) ३१ धावा जोडल्या
हार्दिक व जडेजाने २९ चेंडूंत ५२ धावा चोपून पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला. अखेरच्या षटकात ७ धावा हव्या असताना जडेजाचा ( ३५ ) त्रिफळा उडवला. मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत ६ धावा हव्या असताना हार्दिकने षटकार खेचून विजय पक्का केला. भारताने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. हार्दिकने १७ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या.
चाहता त्याच्या कुटुंबासह भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आला होता. त्याच्या हातातील पोस्टवरील मजकूर चर्चेचा विषय ठरला. त्यावर त्याने लिहिले होते की, दिल है हिंदुस्थानी, लेकिन बिवी पाकिस्तानी!