Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी फलंदाजीत कमाल करताना श्रीलंकेला १७० धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल करताना पाकिस्तानला बॅकफूटवर फेकले. मोहम्मद रिझवान व इफ्तिकार अहमद खेळपट्टीवर असेपर्यंत पाकिस्तानला विजयाच्या आशा होत्या, परंतु वनिंदूने एका षटकात तीन धक्के देत सामना फिरवला.
कर्णधार बाबर आजम याचा अपयशाचा पाढा अंतिम सामन्यातही कायम राहिला. चौथ्या षटकात प्रमोद मदुशान ( Pramod Madushan) याने टाकलेला चेंडू फाईन लेगला बाबरने मोठ्या तावात टोलावला, परंतु मदुशंकाने तितक्याच चपळाईने झेल घेतला. बाबर ५ धावांवर माघारी परतला, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर फखर जमान त्रिफळाचीत झाला. बाबरने आशिया चषक स्पर्धेत ६ सामन्यांत ६८ धावा केल्या. रिझवान व अहमन यांनी पाकिस्तानचा डाव सावरताना ५९ चेंडूंत ७१ धावा जोडल्या. ही डोईजड झालेली जोडी तोडण्यासाठी पुन्हा मदुशानला गोलंदाजीला बोलावले गेले आणि त्याने त्याचे काम केले. त्याने टाकलेला संथ चेंडू अहमदने उत्तुंग टोलावला अन् के बंडाराने अप्रतिम झेल घेतला. अहमद ३१ चेंडूंत ३२ धावांवर बाद झाला.
पाकिस्तानला विजयासाठी ३० चेंडूंत ७० धावांची गरज असताना चमिका करुणारत्नेने मोठा धक्का दिला. संथ व आखूड चेंडू टाकून त्याने मोहम्मद नवाजला फटका मारण्यास भाग पाडले. मदुशानने सुरेख झेल टिपत नवाजला ६ धावांवर माघारी पाठवले. रिझवानने षटकार खेचून ४७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संघावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. चार षटकांत ६१ धावा पाकिस्तानला करायच्या होत्या. वनिंदू हसरंगाने १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिझवानची विकेट घेतली. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रिझवान ( ५५ धावा) गुणतिलकाच्या हाती झेलबाद झाला. एका चेंडूच्या अंतराने हसरंगाने आणखी एक विकेट घेताना आसीफ अलीचा ( ०) त्रिफळा उडवला. त्याच षटकात खुशदील शाह ( २) याला बाद करून पाकिस्तानची अवस्था त्याने ७ बाद ११२ अशी केली.