Asia Cup 2022 Final Sri Lanka beat Pakistan : अफगाणिस्तानकडून पहिल्याच सामन्यात पराभव पत्करल्यानंतर श्रीलंकेचा संघ आशिया चषक २०२२ जिंकेल असे कुणाच्या ध्यानी मनी नव्हते. पण, श्रीलंकेने तो करिष्मा करून दाखवला. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही आणि एकामागून एक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी पाकिस्तानला २३ धावांनी हार मानावी लागली. वनिंदू हसरंगा व भानुका राजपक्षा या दोघांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने हा विजय मिळवला. २०१४नंतर प्रथमच श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंकेच्या या विजयानंतर सर्वांनी त्यांचे कौतुक केले. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांनीही श्रीलंकन संघाचे कौतुक केले आणि त्यांनी अप्रत्यक्षितपणे भारतीय संघाला टोमणा मारला...
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रही न ठरलेल्या श्रीलंकेकडून आशिया चषक विजयाची अपेक्षा कुणी केलीच नव्हती. ३ सप्टेंबरला जेव्हा आशिया चषक २०२२ चा जेता कोण असेल असा पोल घेतला गेला, तेव्हा सर्वाधिक ६९ टक्के मत भारताच्या बाजूने होती, त्यापाठोपाठ पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा क्रमांक होता. श्रीलंकेच्या वाट्याला शून्य टक्के मतं आली. प्रमोद मदुशान ( ४-३४) आणि वनिंदू हसरंगा ( ३-२७) यांनी ७ विकेट्स घेत पाकिस्तानचा संपूर्ण संघ १४७ धावांत तंबूत पाठवला. भानुका राजपक्षाने ७१ धावांची खेळी करताना व हसरंगासोबत ५८ धावांची भागीदारी करून ५ बाद ५८ अशा अवस्थेत असणाऱ्या श्रीलंकेला ६ बाद १७० धावांपर्यंत मजल मरून दिली. राजपक्षाने ४५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान व इफ्तिकार अहमद यांनी संघर्ष केला. पण, वनिंदूने १७व्या षटकात तीन विकेट्स घेत सामनाच फिरवला.
आनंद महिंद्रा यांचं ट्विट... श्रीलंकेच्या विजयाने मी रोमांचित आहे, पाकिस्तान हरावं असं मला वाटत होते म्हणून मी हे बोलत नाही. पण, श्रीलंकेचा हा विजय आपल्याला आठवण करून देतो की हा सांघिक खेळ आहे आणि तो सेलिब्रेटी व सुपरस्टार यांच्यापुरता मर्यादित नसून टीमवर्क महत्त्वाचे आहे. श्रीलंकेच्या याच टीम वर्कमुळे ते माझ्यासाठी #MondayMotivation आहेत. त्यांनी फिनिक्स भरारी घेतली आहे आणि ती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.