नवी दिल्ली : आशिया चषकाची (Asia Cup 2022) स्पर्धा सुरू होण्यास आता केवळ एक दिवस उरला आहे. शनिवारपासून या बहुचर्चित स्पर्धेस सुरूवात होणार असून पहिला सामना यजमान श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यामध्ये होणार आहे. तर स्पर्धेचे प्रबळ दावेदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) रविवारी आमनेसामने असणार आहेत. भारत-पाकिस्तानचा सामना होणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधान येत असते. मात्र स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे स्पर्धेआधीच भारताला एक मोठा झटका बसला.
दीपक चहरच्या दुखापतीची अफवा दरम्यान, राहुल द्रविड कोरोना संक्रमित असल्यामुळे स्पर्धेला मुकणार आहेत. आता भारतीय संघाचे नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या खांद्यावर प्रशिक्षकपदाची धुरा असणार आहे. ही जबाबदारी मिळताच लक्ष्मण यांनी संघासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून एका घातक गोलंदाजाला संघात संधी दिली आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा स्टार युवा गोलंदाज कुलदीप सेन भारतीय संघासोबत जोडला गेला आहे, तो नेट बॉलर म्हणून संघासोबत असेल.
दीपक चहर दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला असल्याची अफवा पसरली होती. त्यावर बीसीसीआयने हे सर्व खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे दीपक चहर आशिया चषकात खेळणार असून कुलदीप सेनचा नेट बॉलर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. कुलदीपचा भाऊ जगदीप सेन यानेही BCCIचे निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी 22 ऑगस्टला कॉल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी त्याला संघात निवड झाल्याचे सांगितले, आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने 20 लाखांत कुलदीपला आपल्या ताफ्यात घेतले होते. त्याने 7 सामन्यांत 8 बळी पटकावले होते.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.