नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) चा थरार रंगला आहे. या स्पर्धेचे प्रबळ दावेदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आपल्या पहिल्या सामन्यात २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने आले होते. चुरशीच्या या लढतीत अखेर भारतीय संघाने विजय मिळवून पाकिस्तानला धूळ चारली. मागील वर्षी टी-२० विश्वचषकात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने देशवासियांना जल्लोष करण्याची संधी रविवारी दिली होती. विश्वचषकानंतर प्रथमच समोर आलेल्या पाकिस्तानचा पराभव करून भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.
दरम्यान, हा बहुचर्चित सामना पाहण्यासाठी अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. लक्षणीय बाब म्हणजे हे कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे. कारण भारत-पाकिस्तान हे दोन्हीही संघ अ या एकाच गटात असून हॉंगकॉंग हा या गटातील तिसरा संघ आहे. आज भारत आणि हॉंगकॉंग यांच्यामध्ये सामना होणार आहे, तर शुक्रवारी हॉंगकॉंगचा सामना पाकिस्तानविरूद्ध असणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान दोन्हीही संघानी हॉंगकॉंगचा पराभव केला तर भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रविवारी रंगेल.
...तर रविवारी पुन्हा एकदा रनसंग्राम३१ ऑगस्टला म्हणजेच आज भारत-हाँगकाँग असा सामना होणार आहे आणि २ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग अशी लढत होईल. हे दोन्ही संघ हाँगकाँगवर मात करतील अशी अपेक्षा आहे आणि असे झाल्यास ४ सप्टेंबरला A1 व A2 म्हणजेच गटातील अव्वल दोन संघ ( India-Pakistan ) यांच्यात लढत होईल. तसेच भारत व पाकिस्तानच्या संघाचा फॉर्म पाहता दोन्ही संघ अंतिम फेरीतही एकमेकांसमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अफगाणिस्तानचे कडवे आव्हान Super 4 मध्ये या दोन्ही संघांसमोर असेल. ११ सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेची फायनल होणार आहे.