नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) चे लवकरच बिगुल वाजणार आहे. २७ ऑगस्ट पासून रंगणाऱ्या या स्पर्धेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या बहुचर्चित स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. भारत-पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना होणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण येत असते. विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कारण पाकिस्तानचा कर्णधार बाबर मागील मोठ्या कालावधीपासून शानदार खेळी करून विक्रम रचत चालला आहे. तर किंग कोहलीसमोर आपल्या खराब फॉर्ममधून बाहेर येण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानी संघाचा प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी नुकताच आशिया चषकाच्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे, त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. आशिया चषकापूर्वी जिथे भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांचा सतत उल्लेख केला जातो. तसाच 'सामना' दोन्ही संघाच्या सलामीवीर फलंदाजांमध्ये होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवान यांच्या खेळीकडे अवघ्या जगाचे लक्ष असेल. भारत आणि पाकिस्तान २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने असतील. भारतीय संघाची धुरा पुन्हा हिटमॅन रोहितच्या खांद्यावर असणार आहे.
कोण मारणार बाजी?
रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवान यांच्यात सामन्यांची संख्या, धावा आणि अनुभव यात खूप फरक आहे. रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. रोहितने आतापर्यंत १३२ टी-२० सामन्यांमध्ये ३,४८७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ४ शतके आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा हा जगातील टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चार शतके झळकावणारा फलंदाज आहे. तर मोहम्मद रिझवानने आतापर्यंत ५६ टी-२० सामने खेळले असून त्यामध्ये १ शतक आणि १३ अर्धशतकांसह १,६६२ धावा केल्या आहेत. खरं तर रिझवान रोहितपेक्षा खूप मागे आहे मात्र आगामी आशिया चषकात दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळू शकतो. दोन्हीही फलंदाजांची खेळी आपल्या संघासाठी निर्णायक भूमिका पार पडणारी असेल.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.
Web Title: Asia Cup 2022 in Mohammad Rizwan and Rohit Sharma will see a clash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.