Join us  

T20 Asia Cup 2022 Ind vs HK : हाँगकाँगविरुद्ध विराट कोहलीला सूर गवसला, अर्धशतक झळकावून रोहित शर्माशी केली बरोबरी 

India Vs Hongkong Live Match Highlight : भारतीय फलंदाजांनी हाँगकाँगविरुद्ध दमदार कामगिरी केली. लोकेश राहुल, विराट कोहली यांनी फॉर्म परतल्याचे आपल्या खेळीतून जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 9:05 PM

Open in App

India Vs Hongkong Live Match Highlight : भारतीय फलंदाजांनी हाँगकाँगविरुद्ध दमदार कामगिरी केली. लोकेश राहुल, विराट कोहली यांनी फॉर्म परतल्याचे आपल्या खेळीतून जाहीर केले. सूर्यकुमार यादव त्याच्या नेहमीच्या Mr 360 या रुपात फटकेबाजी करताना दिसला. हाँगकाँगच्या एहसान खान व १९ वर्षीय आयुष शुक्ला यांची फिरकी गोलंदाजी कौतुकास्पद ठरली. विराट व सूर्या या जोडीने २७ चेंडूंत अर्धशतकी धावांची भागीदारी पूर्ण केली. 

रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु मोक्याच्या क्षणी हाँगकाँगच्या १९ वर्षीय गोलंदाज आयुष शुक्लाने विकेट मिळवून दिली. रोहितने १३ चेंडूंत २१ धावांची छोटी खेळी केली असली तरी त्याने आज मोठे विक्रम मोडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५०० धाव करणारा तो जगातला पहिला पुरुष फलंदाज ठरला. रोहित १३ चेंडूंत २१ धावा करून माघारी परतला, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १२ हजार धावांचा टप्पा ओलांडला. वीरेंद्र सेहवाग ( १५७५८), सचिन तेंडुलकर ( १५३३५) व सुनील गावस्कर ( १२२५८) हे आघाडीवर आहेत. तेंडुलकरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाद जलद १२००० धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावे नोंदवला गेला आहे.  लोकेश व विराट कोहली  यांनी नंतर चांगली फटकेबाजी केली. लोकेशचा परतलेला फॉर्म  पाहून सारे सुखावले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. भारताच्या १० षटकांत ७० धावा झालेल्या पाहून ड्रिंक्स ब्रेकमध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मैदानावर आला अन् लोकेश व विराटशी चर्चा केली. त्यानंतर या दोघांनी धावांचा वेग वाढवला. खेळपट्टी गोलंदाजांना अधिक मदत करत होती आणि त्यामुळे लोकेश-विराटला मोठे फटके मारण्यासाठी संघर्ष करावा लागला. १३व्या षटकात मोहम्मद घाझानफरने ही भागीदारी संपुष्टात आणली. लोकेश ३९ चेंडूंत २ षटकारांसह ३६ धावांवर बाद झाला. विराटसोबतची त्याची ४९ चेंडूंवर ५६ धावांची भागीदारीही संपुष्टात आली.  सूर्यकुमार यादव व विराटने चांगले फटके मारले. बऱ्याच दिवसांनी विराटचा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. या दोघांनी १६व्या षटकात २० धावा कुटल्या. पण, एहसान खानने १७ वे षटक अप्रतिम फेकले. केवळ ४ धावा त्याने दिल्या. विराटने ४० चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२०तील त्याचे हे ३१ वे अर्धशतक ठरले आणि त्याने रोहितच्या विक्रमाशी  बरोबरी केली. 

 

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीभारतरोहित शर्मा
Open in App