भारतीय स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची झंझावाती खेळी आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने हाँगकाँग विरूद्ध शानदार विजयाची नोंद केली. आशिया चषक २०२२ च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने हाँगकाँग संघाचा ४० धावांनी पराभव केला. सूर्यकुमारने २६ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान सूर्यकुमारचा स्ट्राइक रेट २६१.५३ होता. SKY म्हणजेच सूर्यकुमार यादव याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. कोहलीने सावध खेळ करत सामन्यात ४४ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. दोघेही नाबाद राहिले पण विशेष बाब म्हणजे या खेळीत सूर्यकुमारने दमदार फटकेबाजी केली. त्यानंतर विराट कोहली सूर्यकुमारवर स्तुतिसुमने उधळली.
विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. सूर्याच्या खेळीसमोर विराट कोहली नतमस्तक झाला. विराट कोहलीने BCCI.TV वर सूर्यकुमार यादवची मुलाखत घेतली. या दरम्यान विराट कोहली सांगितले, "सूर्यकुमार यादवच्या खेळाने माझी पूर्णपणे झोप उडवली. मी आज सूर्यकुमारची मुलाखत घेत आहे याचा मला अभिमान आहे. या सामन्यात त्याने शानदार खेळी केली आहे. मी दुसऱ्या बाजूला उभा राहून त्याच्या डावाचा आनंद घेत होतो. त्याने धमाकेदार खेळी खेळून संपूर्ण माहोलच बदलून टाकला. खरे सांगायचे तर खेळपट्टी फलंदाजीला तितकीशी चांगली नव्हती, पण अशा स्थितीत सूर्याने उत्कृष्ट खेळी खेळली", असे विराट म्हणाला.
"मी तुला आयपीएल आणि टीम इंडियामध्ये खेळताना अनेकदा पाहिले आहे, पण आज पहिल्यांदाच तुझी खेळी खूप जवळून पाहिली. मी पूर्णपणे अवाक् झालो. मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. खेळ कसा पुढे न्यायचा याची तुमच्या मनात एक योजना ठरलेली होती. तू पण माझ्याशी बोलत होतास. आपण जसे खेळलो आणि जशी चर्चा केली, त्या सगळ्या गोष्टींबद्दल काय मत आहे", असे कोहलीने सूर्याला विचारले.
यावर सूर्यकुमार म्हणाला, "सर्वप्रथम मी सांगतो की मला तुझ्यासोबत फलंदाजी करायला आवडते. ड्रेसिंग रुममध्ये बसून रिषभ पंत आणि आम्ही रणनीतीबद्दल बोलत होतो. खेळपट्टी अतिशय संथ असल्याचे आम्हाला माहीत होते. मी जेव्हा फलंदाजीला आलो तेव्हा माझा आवडता खेळ खेळण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. आल्यापासूनच मी फटके मारायला सुरुवात केली. प्लॅन अगदी सोपा होता की चेंडू सीमारेषेपार पोहोचवायचा. त्यात तुझ्यासारखा महान फलंदाज दुसऱ्या बाजूला उभा असल्याने मला खेळ खेळणे अधिक सोपे गेले", असे सूर्याने विराटला उत्तर दिले.