Join us  

Asia Cup 2022 Team India: पाकिस्तान विरूद्ध जिंकूनही रोहित शर्मा उद्याच्या सामन्यात 'या' २ खेळाडूंना दाखवू शकतो बाहेरचा रस्ता

रोहित-विराट सलामीला उतरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:29 PM

Open in App

Asia Cup 2022 Team India: आशिया चषक २०२२ मध्ये भारताने पाकिस्तानला हरवून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. पाच गडी राखून मिळविलेल्या या विजयानंतर भारताचा उत्साह वाढला असून आता पुढील सामना ३१ ऑगस्टला हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. पहिल्या सामन्यातील विजयानंतर सुपर-४ मध्ये भारताचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात काही प्रयोग करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. कर्णधार रोहित शर्मा हाँगकाँग विरुद्ध 'प्लेइंग ११' बदलणार का, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. पहिल्या सामन्यात तुल्यबळ पाकिस्तानचा सामना केल्यानंतर आता भारताला तुलनेने दुबळ्या मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगचा सामना करायचा आहे. अशा वेळी, 'बेंच स्ट्रेंथ' आजमावण्याची टीम इंडियाकडे उत्तम संधी आहे.

रोहित शर्मा करू शकतो २ महत्त्वाचे बदल 

पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्माने रिषभ पंतला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि दिनेश कार्तिकला 'प्लेइंग ११' मध्ये स्थान मिळाले. त्यामुळे हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला संधी दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत दिनेश कार्तिकला सुपर-४ च्या फेरीआधी पुरेशी विश्रांतीही मिळू शकते, तसेच सुपर-४ साठी नवीन कॉम्बिनेशन आजमावण्याचीही संधी मिळू शकते. त्याशिवाय, गोलंदाजीतही असा निर्णय घेतला जाऊ शकतो. युजवेंद्र चहलच्या जागी रविचंद्रन अश्विनला मैदानात उतरवले जाऊ शकते. चहलने पाकिस्तानविरुद्ध एकही विकेट घेतली नाही. त्यामुळे अश्विनला संधी मिळाल्यास अश्विन-जाडेजा जोडी मैदानावर काही कमाल करते का, हे पाहता येऊ शकेल. टीम इंडिया टी२० वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषक स्पर्धा खेळत आहे. अशा वेळी येत्या काळात संघात विविध प्रयोग नक्कीच केले जाऊ शकतात.

खेळाडूंची प्रतिभा तपासण्यासाठी प्रयोग केले जावेत, हे खरे असले तरी असाही एक तर्क आहे की टीम इंडिया कोणताही बदल न करता मैदानात उतरू शकते. कारण कोणताही कर्णधार किंवा प्रशिक्षक आपले 'विनिंग कॉम्बिनेशन' उगाच बदलण्याची जोखीम घेणे कितपत पसंत करेल. यासोबतच खेळाडूंनाही सतत संधी मिळाली तर त्यांचा फॉर्म ते कायम ठेवू शकतात आणि काही खेळाडू लयीत देखील परतू शकतात.

रोहित-विराट सलामीला उतरणार?

सध्या भारत नवीन सलामीची योग्य जोडी शोधण्यासाठीही प्रयत्न करत आहे. टी२० मध्ये रोहित शर्मासोबत विराट कोहली याआधी सलामीला उतरला आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये ओपनिंग करतो, त्यामुळे केएल राहुल यशस्वी झाला नाही, तर नवी रिस्क घेतली जाऊ शकते. टीम इंडिया सध्या आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे रोहित-विराटला सुरुवातीपासून आक्रमण करण्याची संधी असेल. मात्र दुबळ्या हाँगकाँगसमोर संघ व्यवस्थापन किती जोखीम पत्करते हे मात्र पाहावे लागेल.

टॅग्स :एशिया कप 2022रोहित शर्मारिषभ पंतविराट कोहली
Open in App