Arshdeep Singh, IND vs PAK: भारतीय संघाचा आशिया चषक स्पर्धेत आज श्रीलंकेविरूद्ध सामना रंगणार आहे. आजचा सामना भारतासाठी करो वा मरो पद्धतीचा असणार आहे. या आधी सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभवाची चव चाखावी लागली. भारतीय संघाने सामन्यात जोरदार कमबॅक करून सामना अखेरच्या टप्प्यात नेला होता. मात्र अर्शदीप सिंग या युवा खेळाडूच्या हातून पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली याचा झेल सुटला. तो झेल भारताला चांगलाच महागात पडला. त्यानंतर अर्शदीपच्या बचावासाठी अनेक चाहते, आजी-माजी खेळाडू मैदानात उतरले. पण सोशल मीडियावर काही चाहत्यांनी अर्शदीपवर सडकून टीका केली. काहींनी तर त्याचे थेट 'खलिस्तानी कनेक्शन' जोडण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या प्रकारावर अखेर अर्शदीपच्या पालकांनी मौन सोडले.
अर्शदीपचे वडिल दर्शन सिंग हे भारत-पाक सामन्याच्या वेळी दुबईत स्टेडियममध्ये बघून मॅच बघत होते. त्यांनी या घटनेबाबत आपली मतं मांडली. "आपल्या मुलाच्या बाबतीत असं काही घडत असेल तर पालक म्हणून त्याचं आम्हाला वाईट वाटणं नक्कीच स्वाभाविक आहे. तो केवळ २३ वर्षांचा आहे. त्याला ट्रोल करण्यात आलं, त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. कारण तुम्ही सगळ्यांची तोंडं बंद करू शकत नाही. चाहते नसतील तर खेळाला मजाच येत नाही. काही चाहते असे असतात जे काहीही झालं तरी तुमची साथ सोडत नाहीत, पण दुसरीकडे काही असाही चाहतावर्ग असतो जो एक पराभव देखील पचवू शकत नाही. पण साऱ्यांनीच हे लक्षात घेतलं पाहिजे की, विजय दौघांपैकी एकाच कोणाचा तरी होतो", असे दर्शन सिंग इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले.
अर्शदीपची आई बलजीत कौर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. "आम्ही हा प्रकार घडल्यानंतर अर्शदीपशी बोललो. अर्शदीप आम्हाला म्हणाला की अशा ट्विट्स आणि मेसेजकडे मी फारसे लक्ष देत नाहीये. मी यातून फक्त सकारात्मक ऊर्जाच घेतो. मला अशा टीकेतून आणखी चांगली कामगिरी करण्याचा विश्वास मिळतो. संपूर्ण भारतीय संघ त्याच्या पाठिशी आहे असं अर्शदीपने आम्हाला सांगितलं. प्रत्येक क्रिकेटरला आपला संघ जिंकवायचा असतो. पण असे काही प्रकार घडल्याने आता अर्शदीप मानसिकदृष्ट्या आणखी कणखर बनेल", असे दर्शन सिंग आणि बलजीत कौर यांनी सांगितले.
दरम्यान, अर्शदीपने जेव्हा त्याचा झेल सोडला, त्यानंतर शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. अशा वेळी पाकिस्तानने १ चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. आसिफ अलीने ८ चेंडूत १६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. आता भारताचे सुपर-४ मधील पुढील दोन सामने श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांशी आहेत. त्यामुळे हे दोनही सामने जिंकले तरच भारताला अंतिम फेरी गाठणे शक्य आहे.