Asia Cup 2022, IND vs SL: भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत दोनही सामने जिंकून दमदार सुरूवात केली. आधी पाकिस्तान आणि त्यानंतर हाँगकाँगला पराभूत करत भारत सुपर-४ मध्ये पोहोचला. पण कागदासह मैदानातही बलाढ्य दिसणाऱ्या टीम इंडियाला सुपर-४ च्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने धूळ चारली. १८०पेक्षा जास्त धावांचे आव्हान देऊनही भारतीय गोलंदाजांना या आव्हानाचा बचाव करता आला नाही. त्यामुळे आता भारतासाठी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्या विरूद्ध शिल्लक असलेले सुपर-४ चे दोनही सामने जिंकणे क्रमप्राप्त आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा कर्णधार म्हणून काही कठोर निर्णय घेणार आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे आजच्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात एका अनुभवी खेळाडूला संघाबाहेर बसवले जाण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तान विरूद्ध गोलंदाजांनी केली टीम इंडियाची निराशा
भारतीय संघाने सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. टी२० सामन्यात या आव्हानाचा बचाव करणे गोलंदाजांसाठी कठीण नसते. पण भारतीय संघातील गोलंदाजांना या आव्हानाचा बचाव करता आला नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई या पाच गोलंदाजांनी ४-४ षटकांचा कोटा पूर्ण करत प्रत्येकी १-१ बळी टिपला. पण भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल यांनी ४ षटकांत ४० पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. परिणामी, यापैकी एका खेळाडूला बाहेर बसवून त्या जागी बेंचवरील एखादा दमदार खेळाडू संघात घेतला जाण्याची शक्यता आहे.
नक्की कोणाला बाहेर बसवलं जाणार?
हार्दिक आणि भुवनेश्वर हे दोघेही वेगवान गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. तर युजवेंद्र चहल लेग स्पिनर आहे. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात या तिघांनीही निराशा केली असती तरी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर बसवणे निव्वळ अशक्य आहे. त्याच्या जागी पर्याय म्हणून आवेश खानला संधी देणे फारसे फायद्याचे ठरणार नाही कारण त्याने आधीच्या सामन्यांमध्ये भरपूर धावा दिल्या आहे. हार्दिक पांड्याला देखील संघातून वगळणे योग्य ठरणार नाही. वरच्या फळीत राहुल-रोहित, विराट, रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत हार्दिकची फलंदाजीतील जबाबदारी महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत अनुभव असूनही युजवेंद्र चहलला संघाबाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता आहे. रवी बिश्नोईच्या रूपाने भारताकडे लेग स्पिनर आहे. त्यामुळे दुसऱ्या स्पिनर म्हणून ऑफ स्पिनर आर अश्विनला संघात स्थान मिळू शकते. त्याचा अनुभव पाहता, मोक्याच्या क्षणी तो फलंदाजीही करू शकतो. त्यातच रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने हार्दिकसोबत आणखी एक परिपूर्ण ऑलराऊंडर म्हणून अश्विनला संघात स्थान मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
श्रीलंकेविरूद्ध आज असा असू शकतो भारताचा संघ-रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, आर अश्विन, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग