Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : श्रीलंकेचा खेळ दिवसेंदिवस बहरत चालला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेने दमदार पुनरागमन केले. सुपर ४ च्या आजच्या सामन्यात त्यांनी जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतालाच बाहेर केले. भारताने विजयासाठी ठेवलेले १७४ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने ६ विकेट्स व १ चेंडू राखून रोमहर्षक रित्या पार केले. या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने काही सहकाऱ्यांचे कान टोचले, तर काहींचे कौतुक केले.
भारताकडून रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व व ४ षटकारांसह ७२ धावांवर बाद झाला. सूर्यकुमारने ३४ धावा केल्या. हार्दिक पांड्या ( १७), रिषभ पंत ( १७) व दीपक हुडा ( ३ ) धावांवर माघारी परतले. दिलशान मदुशंकाने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. आर अश्विनने ७ चेंडूंत १५ धावा केल्या. प्रत्युत्तरात कुसल मेंडिस ( ५७) व पथूम निसंका ( ५२) यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या. त्यानंतर दासून शनाका व भानुका राजपक्षा यांनी ३४ चेंडूंत नाबाद ६४ धावा करून ६ विकेट्स राखून विजय मिळवला. शनाका १८ चेंडूंत ३३ धावांवर, तर राजपक्षा २५ धावांवर नाबाद राहिला.
रोहित म्हणाला...''आमचा शेवट चुकीच्या बाजूने झाला, हे एवढं सोपं आहे. ज्या प्रकारे आम्ही धावा केल्या, त्यात अधिक भर घालता आली असती. १०-१५ धावा कमी पडल्या. मधल्या फळीने या पराभवातून शिकायला हवं.. कशा प्रकारे फटके मारल्याने काय होतं, याचा त्यांनी अभ्यास करायला हवा. आमचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय, अशा पराभवाने आम्हाला आणखी चांगलं काही शिकण्यास मदत मिळेल,'' असे रोहितने सांगितले. त्याने अप्रत्यक्षितरित्या हार्दिक, रिषभ व दीपक यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
गोलंदाजांचे कौतुक करताना तो म्हणाला, ''गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. फिरकीपटूंनी आक्रमक गोलंदाजी केली. त्यांनी अखेरपर्यंत श्रीलंकेचे टेंशन वाढवले होते. सीमारेषा दूर असल्याने फिरकीपटूंचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेता येईल, असा विचार केला होता. त्यांचे राईट हँडेड फलंदाज अधिक काळ खेळपट्टीवर टिकले. मी दीपक हुडाला गोलंदाजी देण्याचाही विचार केला होता, परंतु तो यशस्वी ठरला नसता असे मला वाटले. अर्शदीप सिंगने चांगली गोलंदाजी केली.''
''हार्दिकच्या पुनरागमनानंतर आम्ही तीन जलदगती गोलंदाजांसह खेळतोय, हार्दिक चौथ्या जलदगती गोलंदाजाची भूमिका पार पाडतोय. पण, वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन आम्हाला सर्व पर्यायांचा विचार करायला हवा. सलग दोन सामने पराभूत झाल्याने चिंता करण्यासारखं काही नाही. मागील वर्ल्ड कपनंतर आम्ही फार कमीच सामने गमावले आहेत.आम्ही अद्यापही काही प्रश्नांची उत्तरं शोधतोय अन् अशा सामन्यातून ती मिळतात,''असेही रोहित म्हणाला.