Join us  

Asia Cup 2022, IND vs SL : धक्कादायक! टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतून जवळपास बाद, श्रीलंकेची फायनलमध्ये एन्ट्री

Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. युजवेंद्र चहलने तीन विकेट्स घेत सामन्यात चुरस निर्माण केली, परंतु त्याला उशीर झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 11:10 PM

Open in App

Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. भारताने विजयासाठी ठेवलेले १७४ धावांचे लक्ष्य हे दोघंच पार करतील असे चित्र दिसत होते. पण, युजवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal) तीन विकेट्स घेत भारताच्या आशा पल्लवीत केल्या. त्यात आर अश्विननेही १ विकेट्सची भर टाकली.  बिनबाद ९७ वरून श्रीलंकेची अवस्था ४ बाद १११ धावा अशी झाली होती. पण, श्रीलंकेचं नशीब आज जोरात होतं. २ चेंडूंत २ धावा हव्या असताना रिषभ पंत व अर्शदीप सिंग यांच्याकडून रन आऊटची संधी हुकली अन् श्रीलंकेने बाजी मारली. 

कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करून दिली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता श्रीलंकेने ५७ धावा केल्या. भारताचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरताना दिसले. भारताचे क्षेत्ररक्षणही ढिसाळ होताना दिसले. त्यामुळे रन आऊटच्या संधीही हुकल्या. मेंडिस व निसंका ही जोडी भारतीय खेळाडूंवर भारी पडली. हे दोघं सहज चोरटी धाव घेत होते. निसंकाने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १२व्या षटकात युजवेंद्र चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले. ३७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ५२ धावा करणारा निसंकाचा रोहितने अप्रतिम झेल टिपला. त्याच षटकात चरिथ असलंका ( ०) माघारी परतला. पुढच्याच षटकात आर अश्विनने चतुराईने दनुष्का गुणतिलकाला ( १) माघारी पाठवून श्रीलंकेवरील दडपण वाढवले.  

चहलने आणखी एक मोठी विकेट मिळवून दिली. मेंडिस ३७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा करून LBW झाला. चहलने त्याच्या ४ षटकांत ३४ धावांत ३  विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला ३० चेंडूंत ५४ धावा करायच्या होत्या. चौथ्या षटकात १२ धावा आल्याने अश्विनची कामगिरी ४-०-३२-१ अशी राहिली. श्रीलंकेला २४ चेंडूंत ४२ धावा करायच्या होत्या आणि भानुका राजपक्षा व कर्णधार दासून शनाका खेळपट्टीवर होते. अर्शदीपच्या षटकात रोहितकडून मिस्ड् फिल्ड झाले. १७व्या षटकात ९ धावा आल्याने श्रीलंकेला अखेरच्या तीन षटकांत ३३ धावा हव्या होत्या. श्रीलंकेचं नशीब जोरात होतं. हार्दिकने टाकलेल्या १८व्या षटकात शनाकाला पहिल्या स्लीपमधून चौकार मिळाला अन् पाचव्या चेंडूवर त्याने षटकार खेचला. त्या षटकात श्रीलंकेने १२ धावा काढल्या.  हार्दिकच्या ४ षटकांत ३५ धावा आल्या. शनाका व राजपक्षा यांनी श्रीलंकेला आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. भारताचा आशिया चषक २०२२ स्पर्धेतील प्रवास इथेच संपला. अखेरच्या षटकात ७ धावा त्यांना करायच्या होत्या अन् अर्शदीप गोलंदाजीला आला. अर्शदीपने पहिले दोन चेंडू भन्नाट यॉर्कर टाकले. २ चेंडूंत २ धावा हव्या असताना अर्शदीपने निर्धाव चेंडू टाकला, परंतु लंकन फलंदाज धाव घेण्यासाठी पळाले. रिषभकडून रन आऊट हुकला नंतर अर्शदीपचा नेम चुकल्याने लंकेला अतिरिक्त एक धाव घेता आली. शनाका १८ चेंडूंत ३३ धावांवर, तर राजपक्षा २५ धावांवर नाबाद राहिला. 

रोहित-सूर्यकुमारने सावरला डाव...  रोहित शर्माने ( Rohit Sharma) आज कॅप्टन्स इनिंग्ज खेळली. लोकेश राहुल ( ६) व विराट कोहली (० ) बाद झाल्यानंतर रोहित व सुर्याने डाव सावरला. २ बाद १२ अशी दयनीय अवस्था असताना रोहितने मुंबईकर सूर्यकुमार यादवला सोबतीला घेऊन तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. हार्दिक पांड्या, रिषभ पंत  व दीपक हुडा यांनी पुन्हा निराश केले. रोहित बाद झाल्यानंतर ६३ धावांत भारताने ६ फलंदाज गमावले. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व व ४ षटकारांसह ७२ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ शनाकाने सेट फलंदाज सूर्यकुमारला ( ३४) बाद केले. इथून भारताची गाडी घसरली.  हार्दिक पांड्या ( १७), रिषभ पंत ( १७) व दीपक हुडा ( ३ ) धावांवर माघारी परतले. दिलशान मदुशंकाने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. आर अश्विनने ७ चेंडूंत १५ धावा केल्या.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्मा
Open in App