Join us  

Asia Cup 2022 : श्रीलंका चॅम्पियन बनला अन् गौतम गंभीरने त्यांचा झेंडा हाती घेतला; म्हणाला, सुपरस्टार टीम... Video

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रही न ठरलेल्या श्रीलंकेकडून आशिया चषक विजयाची अपेक्षा कुणी केलीच नव्हती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:39 AM

Open in App

Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला २३ धावांनी श्रीलंकेकडून हार मानावी लागली. वनिंदू हसरंगा व भानुका राजपक्षा या दोघांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने हा विजय मिळवला. २०१४नंतर प्रथमच श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकन संघाने फिनिक्स भरारी घेतली आणि थेट जेतेपदाला गवसणी घातली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले, परंतु भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने थेट श्रीलंकेचा झेंडा हाती घेऊन फडकवला. 

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रही न ठरलेल्या श्रीलंकेकडून आशिया चषक विजयाची अपेक्षा कुणी केलीच नव्हती. ३ सप्टेंबरला जेव्हा आशिया चषक २०२२ चा जेता कोण असेल असा पोल घेतला गेला, तेव्हा सर्वाधिक ६९ टक्के मत भारताच्या बाजूने होती, त्यापाठोपाठ पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा क्रमांक होता. श्रीलंकेच्या वाट्याला शून्य टक्के मतं आली. गौतम गंभीरनेही समालोचन करताना श्रीलंका विजय मिळवेल याची शक्यता कमीच असल्याचे मत मांडले होते. त्यामुळेच सामना संपल्यानंतर जेव्हा गंभीर मैदानावर प्रेझेंटेशनसाठी आला तेव्हा श्रीलंकेच्या चाहत्यांनी त्याच्या नावाचा गजर केला. तेव्हा गंभीरने श्रीलंकेचा झेंडा हाती घेऊन फडकवला. त्याने नंतर ट्विटही केले, हा सुपरस्टार संघ आहे आणि ते याचे हकदार आहेत, असे त्याने लिहिले.   श्रीलंकने २३ धावांनी विजय मिळवला. प्रमोद मदुशान ( ४-३४)  आणि वनिंदू हसरंगा ( ३-२७) यांनी ७ विकेट्स घेत पाकिस्तानचा संपूर्ण संघ १४७ धावांत तंबूत पाठवला. भानुका राजपक्षाने ७१ धावांची खेळी करताना व हसरंगासोबत ५८ धावांची भागीदारी करून ५ बाद ५८ अशा अवस्थेत असणाऱ्या श्रीलंकेला ६ बाद १७० धावांपर्यंत मजल मरून दिली.  राजपक्षाने ४५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान व इफ्तिकार अहमद यांनी संघर्ष केला. पण, वनिंदूने १७व्या षटकात तीन विकेट्स घेत सामनाच फिरवला. 

आशिया चषक स्पर्धेचा इतिहास१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. सहा जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.   

टॅग्स :एशिया कप 2022गौतम गंभीरश्रीलंकापाकिस्तान
Open in App