नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर सुरू असलेल्या आशिया चषकाच्या (Asia CuP 2022) स्पर्धेत आज श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) आमनेसामने असणार आहेत. दोन्हीही संघ या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत होऊन इथपर्यंत आले आहेत. त्यामुळे आज होणारा सामना दोन्हीही संघासाठी 'करा किंवा मरा' असा असेल. विशेष म्हणजे बांगलादेश आणि श्रीलंका या संघाना त्यांच्या सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने पराभूत केले होते. मात्र आज जो संघ विजयी होईल त्याला सुपर-4 मध्ये प्रवेश मिळणार आहे, तर पराभूत संघासाठी आशिया चषकातील पुढील रस्ता बंद असेल.
'करा किंवा मरा' अशी होणार लढत
दरम्यान, आशिया चषकातील ग्रुप बी मध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघाचा समावेश आहे. अफगाणिस्तानच्या संघाने बांगलादेश आणि श्रीलंकेला पराभूत करून सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन्हीही संघ सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहेत. बांगलादेशने त्यांच्या मागील 16 सामन्यांपैकी 14 टी-20 सामने गमावले आहेत, तर श्रीलंकेने 14 टी-20 सामन्यांपैकी 10 सामने गमावले आहेत. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यापैकी श्रीलंकेने 8 तर बांगलादेशने 4 जिंकले आहेत. पण या दोन संघांमधील शेवटच्या 3 सामन्यांवर नजर टाकली तर बांगलादेशने 2 सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने केवळ एक सामना जिंकला आहे.
आजच्या सामन्यासाठी संभावित संघ -बांगलादेश - शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, अनामूल हक, अफिफ होसैन, मुशफिकुर रहिम, महमुदुल्लाह, साबिर रहमान, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, नासुम अहमद, मुस्ताफिजुर रहमान.
श्रीलंका - दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, पाथुम निसांका, चरित असालंका, भानुका राजपक्षा, धनुष्का गुनाथिलाका, वानिंदु हसारंगा, चामिका करूणारत्ने, महीष तीक्ष्णा, मथिषा पाथिराना, दिलशान मादुशंका.