टीम इंडियाने (Team India) आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध विजयी सलामी देत सुरूवात केली. पाठोपाठ हाँगकाँगलाही पराभूत करत दिमाखात सुपर-४ फेरी गाठली. पण सुपर-४ मध्ये भारताचं नशिब फिरलं. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने (IND vs PAK) भारताला ५ गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने (IND vs SL) भारताला ६ गडी राखून पराभूत केले. टीम इंडियाचा दोन सामन्यात पराभव झाल्याने आता, फायनल गाठण्यासाठी भारताचे भवितव्य लांबचा शेजारी असलेल्या अफगाणिस्तावर आहे. आज अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानविरूद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. पाकिस्तानने आजचा सामना जिंकण्यासाठी तगडा संघ मैदानात उतरवला आहे. पण अफगाणिस्तानने देखील गेल्या मॅचमधील पराभवानंतर संघात दोन बदल करत विजयी इरादा पक्का केल्याचं दाखवलं आहे.
पाकिस्तानच्या तगड्या संघासमोर अफगाणिस्तानने केले दोन बदल
पाकिस्तानच्या संघाने गेल्या सामन्यात भारताला ५ गडी राखून धूळ चारली होती. त्यानंतर हीच विजयी लय कायम राखण्याच्या दृष्टीने त्यांना तगडा संघ मैदानात उतरवला आहे. आजच्या संघात पाकिस्तानने एकही बदल केलेला नसला तरी अफगाणिस्तानने मात्र दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. अजमतुल्ला उमरझाई आणि फरीद अहमद या दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
अफगाणिस्तानचा संघ- हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, राशिद खान, अजमतुल्ला उमरझाई, फरीद अहमद, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारुकी
पाकिस्तानचा संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ, मोहम्मद हसनैन
भारतासाठी फायनलचं नक्की काय आहे गणित?
भारतीय संघाचे फायनलचे गणित आता इतर तीन संघांवर अवलंबून आहे. सध्या श्रीलंका २ तर पाकिस्तान १ सामना जिंकून आघाडीवर आहे. यापुढील सामन्यांमध्ये जर अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानला हरवले, भारताने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने हरवले आणि श्रीलंकेच्या संघाने शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाची चव चाखायला लावली, तर सुपर-४ मध्ये श्रीलंका ३ पैकी ३ सामने जिंकून थेट फायनलमध्ये जाईल. पण इतर ३ संघ १ विजय मिळवून समान गुणांवर असतील. अशा वेळी सर्वोत्तम नेट रन रेट असलेल्या संघाला फायनल गाठण्याची संधी मिळणार आहे.