Asia Cup 2022, Pakistan vs HongKong : भारतीय संघाकडून सपाटून मार खाणारे दोन संघ पाकिस्तान व हाँगकाँग आज आशिया चषक स्पर्धेत आव्हान टीकवण्यासाठी एकमेकांना भिडणार आहे. आजच्या सामन्यातील विजेता संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल, तर दुसऱ्याचा प्रवास इथेच संपेल. भारताविरुद्ध पाकिस्तानला १४७ धावा करता आल्या होत्या, तर हाँगकाँगने १९२ धावांच्या प्रत्युत्तरात १५० धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात धक्कादायक निकाल लागेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. आज पाकिस्तान जिंकल्यास रविवारी पुन्हा एकदा India vs Pakistan यांच्यातला मेगा ब्लाकबस्टर पाहायला मिळेल.
कर्णधार बाबर आजम पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता आणि मोहम्मद रिझवानने एकाकी खिंड लढवली होती. आजच्या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या. दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला १३ धावांवर पहिला धक्का बसला. सातत्यपूर्ण कामगिरी करत आशिया चषक स्पर्धेत धमाका करण्यासाठी सज्ज असलेला बाबर आजम ( Babar Azam) पुन्हा अपयशी ठरला. हाँगकाँगच्या ३७ वर्षीय एहसान खानने तिसऱ्या षटकात बाबरचा ( ९) रिटर्न कॅच पकडला.