Asia Cup 2022, Pakistan vs HongKong : पाकिस्तान संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या Super 4 मध्ये प्रवेश केला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्यांनी हाँगकाँगवर दणदणती विजयाची नोंद केली. मोहम्मद रिझवान, खुशदील शाह व फाखर जमान यांनी दमदार फलंदाजी करताना १९३ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल करताना हाँगकाँगचा डाव ३८ धावांवर गुंडाळला. नसीम शाहने सुरुवातीला धक्के दिल्यानंतर मोहम्मद नवाज व शादाब खान यांनी हाँगकाँगची कंबरडे मोडले.
बाबर आजम पुन्हा अपयशी ठरला असला तरी मोहम्मद रिझवान व फाखर जमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. हाँगकाँगचे गोलंदाज टिच्चून मारा करताना दिसले आणि त्यामुळे पाकिस्तानच्या धावांचा वेग मंदावलेलाच होता. १० षटकांत पाकिस्तानला ६४ धावा करता आल्या. रिझवान व जमान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना दुसऱ्या विकेटसाठी ८१ चेंडूंत ११६ धावा जोडल्या. जमान ४१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ५३ धावांवर माघारी परतला. खुशदील शाह व रिझवान अखरेपर्यंत संघर्ष करताना दिसले. रिझवानने ५७ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ७८ धावा केल्या. खुशदीलने २०व्या षटकात चार षटकार खेचले. पाकिस्तानने २ बाद १९३ धावांचा डोंगर उभा केला. खुशदील १५ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ३५ धावा केल्या.
नसीम शाहने हाँगकाँगला १६ धावांवर दोन धक्के दिले. कर्णधार निजाकत खान ( ८) याला झेलबाद केल्यानंतर नसीमने तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बाबर हयातचा त्रिफळा उडवला. शाहनवाज दहानीने हाँगकाँगला तिसरा धक्का दिला. यासीम मुर्तझाचा ( २) सुरेख झेल खुशदील शाहने टिपला. त्यानंतर शादाब खानने १ धावा करणाऱ्या ऐजाज खानचा त्रिफळा उडवला. मोहम्मद नवाजने ८व्या षटकात किंचित शाह ( ६) व स्कॉट मॅकेचनी ( ४) यांना पाठोपाठ माघारी पाठवून हाँगकाँगची अवस्था ६ बाद ३१ धावा अशी दयनीय केली. हरून अर्षदही ३ धावांवर शादाबच्या गोलंदाजीवर माघारी परतला. नवाजने आणखी एक विकेट घेतली. हाँगकाँगचे ५ फलंदाज अवघ्या १२ धावांत माघारी परतले. शादाबने तिसरी विकेट घेत हाँगकाँगला ३८ धावांवर नववा धक्का दिला. हॅटट्रिक हुकली तरी शादाबने पुढच्या चेंडूवर चौथी विकेट घेत हाँगकाँगला ३८ धावांत गुंडाळले.
ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही पूर्ण सदस्यत्व असलेल्या देशांमधील सर्वात निचांक कामगिरी ठरली. २०१४ मध्ये श्रीलंकेने नेदरलँडला ३९ धावांवर ऑल आऊट केले होते. पाकिस्तानने १५५ धावांनी मिळवलेला विजय हा आशिया चषक स्पर्धेतील मोठा विजय ठरला, तर हाँगकाँगनेही निचांक धावसंख्येचा नकोसा विक्रम नावावर केला. शादाबने ८ धावांत ४ विकेट्स, नवाजने ५ धावांत ३ विकेट्स, तर नसीमने ७ धावांत २ विकेट्स घेतल्या. हाँगकाँगच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.