Ravindra Jadeja, Asia Cup 2022: आशिया चषक २०२२ च्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) ५ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने भारताला २० षटकात १४८ धावांचे माफक आव्हान दिले होते. ते आव्हान गाठण्यासाठी भारतीय संघाला २०वे षटक गाठावे लागले. अखेर शेवटच्या षटकात निर्णायक षटकार खेचत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या सामन्यात रविंद्र जाडेजाने देखील उपयुक्त ३५ धावांची खेळी केली. या सामन्यानंतर आता भारतीय संघाचा बुधवारी हाँगकाँगशी सामना होणार आहे. तत्पूर्वी, रविंद्र जाडेजाने पत्रकारांशी संवाद साधला.
'टीम इंडिया'चा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा म्हणाला की, तो मैदानाबाहेरच्या अफवांकडे लक्ष देत नाही. कारण त्याचे संपूर्ण लक्ष सध्या आशिया चषक आणि आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत देशासाठी चमकदार कामगिरी करण्यावर आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रवींद्र जाडेजा म्हणाला, "मी विश्वचषकासाठी उपलब्ध नसल्याचे तुम्ही मला म्हणत आहात. पण ही अगदी किरकोळ अफवा आहे. मध्यंतरी तर एक अफवा अशी पसरली आहे की 'मी मेलो आहे'. यापेक्षा मोठी अफवा दुसरी काहीच असू शकत नाही. मी या सर्व अफवांचा विचार करत नाही. मी मैदानावर जाणे, खेळणे आणि देशासाठी चांगली कामगिरी करणे यावर लक्ष केंद्रित करतो", असं जाडेजा म्हणाला.
सध्या संघाचे लक्ष हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यावर!
"भारत टी२० विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. पण सध्या सर्वांचे लक्ष हाँगकाँग विरुद्धच्या आगामी सामन्याकडे आणि त्यानंतर 'सुपर-4' टप्प्यावर आहे. आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळू इच्छितो आणि प्रत्येक सामन्यात आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. आमचे लक्ष हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यावर आहे. त्यानंतर कोणत्या संघाविरुद्ध खेळायचे ते पाहू", असे जाडेजा म्हणाला.
भारताने हाँगकाँगवर मात केल्यास त्यांचे सुपर-4 मधील त्याचे स्थान निश्चित होईल.
Web Title: Asia Cup 2022 Ravindra Jadeja gets angry furious on journalist over rumours about death
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.