Join us  

Asia Cup 2022, SL vs AFG : अफगाणिस्तानने १०.१ षटकांत सामना जिंकला; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतला, चौकार-षटकारांचा पाऊस पाडला!

Asia Cup 2022, Sri Lanka vs Afghanistan : अफगाणिस्तानने आशिया चषक २०२२ ची सुरुवात दणक्यात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 10:13 PM

Open in App

Asia Cup 2022, Sri Lanka vs Afghanistan : अफगाणिस्तानने आशिया चषक २०२२ ची सुरुवात दणक्यात केली. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर सलामीवीरांनी तुफान फटकेबाजी करताना श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. फझलहक फारूकीने ३ विकेट्स घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले आणि त्यानंतर माफक लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी धु धु धुतले. रहमानुल्लाह गुर्बाझने १८ चेंडूंत ४० धावा चोपल्या. त्याने हझरतुल्लाह झजाईसह पहिल्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी करून विजय पक्का केला.  अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल करताना माजी विजेत्या श्रीलंकेला १०५ धावांवर गुंडाळले. पहिल्याच षटकात फझलहक फारूकीने दोन धक्के देताना श्रीलंकेला गोंधळवून टाकले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी विकेट घेण्याचे सत्र सुरू ठेवले. भानुका राजपक्षा ( ३८), चमिका करुणारत्ने (३१) व दानुष्का गुणथिलका ( १७) वगळल्यास श्रीलंकेच्या फलंदाजांनी आज निराश केले. एक निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याने चाहते अजून भडकले. कर्णधार मोहम्मद नबी ( २-१४) व  मुजीब उर रहमान ( २-२४) यांनी प्रत्येकी २  विकेट्स घेत धक्के दिले. फारुकीने  ( ३-११) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. करुणारत्नेनं अखेरपर्यंत संघर्ष करताना श्रीलंकेला १०५ धावांपर्यंत मजल मारून दिली. करुणारत्नेनं ३१ धावा केल्या. श्रीलंकेच्या दोन विकेट्स तर फुकट रन आऊट झाल्या. पथुन निसंका ( ३) याला झेलबाद देण्याचा तिसऱ्या अम्पायरचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला. 

महिश थिक्सानाने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती, परंतु DRS घेतल्याने रहमानुल्लाह गुर्बाझ नाबाद ठरला. रहमानुल्लाहने तिसऱ्या षटकात १६ धावा कुटताना पदार्पणवीर ज्युनियर मलिंगा म्हणजेच महिषा पथिरानाची लय बिघडवली. हझरतुल्लाह झजाई व रहमानुल्लाह या जोडीने आक्रमक खेळ करताना पाच षटकांत ५०+ धावा फलकावर चढवल्या. थिक्सानाच्या दुसऱ्या षटकात रहमानुल्लाहने ६, ६, ४ अशी फटकेबाजी केली. झजाईनेही हात साफ केले. पहिल्या पॉवरप्लेमध्ये अफगाणिस्तानने बिनबाद ८३  धावा चोपल्या.  

वनिंदू हसरंगाने ७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर श्रीलंकेला यश मिळवून दिले. रहमानुल्लाह १८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४० धावा करून त्रिफळाचीत झाला.  इब्राहिमा झाद्रानने झजाईला साथ देताना अफगाणिस्ताचा विजय निश्चित केला. झाद्रान १५ धावांवर बाद झाला. झजाई २८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ३७ धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्तानने १०.१ षटकांत १०६ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले. 

टॅग्स :एशिया कप 2022अफगाणिस्तानश्रीलंका
Open in App