Asia Cup 2022, Sri Lanka vs Afghanistan : आशिया चषक २०२२च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल केली. पहिल्याच षटकात फझलहक फारूकीने दोन धक्के देताना श्रीलंकेला गोंधळवून टाकले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी विकेट घेण्याचे सत्र सुरू ठेवले. गोंधळलेल्या श्रीलंकेकडूनही चूका झाल्या अन् दोन फलंदाज सलग चेंडूंवर धावबाद झाले. भानुका राजपक्षा ( ३८), चमिका करुणारत्ने (३१) व दानुष्का गुणथिलका ( १७) वगळल्यास श्रीलंकेच्या फलंदाजांनी आज निराश केले. एक निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याने चाहते अजून भडकले. कर्णधार मोहम्मद नबी व मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत धक्के दिले. फारुकीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या
कुठेय Ultra Edge? पहिल्याच सामन्यात वादाची ठिणगी, अम्पायरच्या निर्णयावर व्यक्त होतोय संताप
कुसल मेंडिस व पथुम निसंका ही जोडी सलामीला आली, परंतु फझलहक फारूकीने पाचव्याच चेंडूवर धक्का दिला. मेंडीस २ धावांवर पायचीत झाला. पुढच्याच चेंडूवर चरिथ असलंकालाही ( ०) पायचीत करून फारुकीने श्रीलंकेची अवस्था २ बाद ३ अशी केली. मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्यानंतर DRS घेतला गेला अन् ही विकेट मिळाली. पुढच्या षटकात नवीन-उल-हकने आणखी एक धक्का देताना पथुम निसंकाला ( ३) झेलबाद केले. चेंडू बॅटची हलकी किनार घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला अन् जोरदार अपील केल्या आणि अम्पायरने बोट वर केलं. श्रीलंकेच्या फलंदाजाने DRS घेतला, परंतु तिसऱ्या अम्पायरने हलक्याशा अल्ट्राएजच्या बळावर बाद हा निर्णय कायम राखला. दोन षटकांत श्रीलंकेची अवस्था ३ बाद ५ धावा अशी झाली. निसंकाला बाद दिल्याच्या निर्णयाने वाद होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचे खेळाडू नाराज दिसले.
दनुष्का गुणथिलका व भानुका राजपक्षा यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. गुणथिलकाला अझमतुल्लाह ओमारजाईने झेल सोडून जीवदान दिले. पण, त्याचा फार फटका बसला नाही. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गुणथिलका ( १७) करीम जनतच्या हाती झेलबाद झाला. राजपक्षा व गुणथिलका यांची ३१ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी तुटली. मुजीबने त्याच्या पुढच्या षटकात श्रीलंकेला आणखी एक धक्का दिला. वनिंदु हसरंगा ( २) झेलबाद होऊन माघारी परतल्याने श्रीलंकेची अवस्था ५ बाद ६० धावा अशी झाली. कर्णधार मोहम्मद नबीने ११व्या षटकात दासुन शनाकाला ( ०) बाद केले.
१३व्या षटकात श्रीलंकेचे फलंदाज गोंधळलेले दिसले. सेट झालेला राजपक्षाही ३८ धावांवर रन आऊट झाला आणि पुढील चेंडूवर महिष थिक्शानाही ( ०) रन आऊट झाल्याने श्रीलंकेला ६८ धावांवर आठवा धक्का बसला. मोहम्मद नबीने धक्कातंत्र कायम राखले. चमिका करुणारत्नेनं अखेरपर्यंत संघर्ष करताना श्रीलंकेला १०५ धावांपर्यंत मजल मारून दिली. करुणारत्नेनं ३१ धावा केल्या. ८२ ही श्रीलंकेचा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील निचांक धावसंख्या आहे. भारताविरुद्ध २०१६ मध्ये विशाखापट्टणम येथे श्रीलंकेचा संपूर्ण संघ ८२ धावांवर तंबूत परतला होता. त्याआधी २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८७ धावांत,२०१७मध्ये भारताविरुद्ध ८७ धावांत, २०२१ला इंग्लंडविरुद्ध ९१ धावांत आणि २०१०ला न्यूझीलंडविरुद्ध ९२ धावांत तंबूत परतला होता.