Asia Cup 2022, SL vs AFG : श्रीलंकेने वचपा काढला! अफगाणिस्तानवर सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला

Asia Cup 2022, Sri Lanka vs Afghanistan : आशिया चषक २०२२ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झालेल्या मानहानिकारक पराभवाचा श्रीलंकेने Super 4 च्या सामन्यात वचपा काढला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 11:11 PM2022-09-03T23:11:40+5:302022-09-03T23:11:59+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022, SL vs AFG : Sri Lanka have defeated Afghanistan by 4 wickets in the Super 4s of Asia Cup | Asia Cup 2022, SL vs AFG : श्रीलंकेने वचपा काढला! अफगाणिस्तानवर सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला

Asia Cup 2022, SL vs AFG : श्रीलंकेने वचपा काढला! अफगाणिस्तानवर सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022, Sri Lanka vs Afghanistan : आशिया चषक २०२२ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झालेल्या मानहानिकारक पराभवाचा श्रीलंकेने Super 4 च्या सामन्यात वचपा काढला. अफगाणिस्तानच्या धावांच्या गतीला अखेरच्या पाच षटकांत श्रीलंकेच्या गोलंदाजांनी घातलेली वेसण निर्णायक ठरली. अफगाणिस्तानला अखेरच्या ५ षटकांत ३७ धावाच करता आल्या होत्या आणि त्या उलट श्रीलंकेने ४९ धावा करून विजय मिळवला. बांगलादेशवर थरारक विजय मिळवून आत्मविश्वास कमावलेल्या श्रीलंकेने सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात विजयी सुरुवात केली. श्रीलंकेने हा सामना ४ विकेट्स राखून जिंकला. 

उपांत्य फेरीचे सामने नाही होणार, मग फायनलचे दोन संघ कसे ठरणार?; जाणून घ्या Super 4 चे समीकरण

अफगाणिस्तान संघाने पुन्हा एकदा सर्वांना थक्क करणारी कामगिरी करून दाखवली. नाणेफेकीचा कौल विरोधात गेला अन् प्रथम फलंदाजी करावी लागणार याचं दडपण न घेता अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली. रहमनुल्लाह गुर्बाझ ( Rahmanullah Gurbaz ) याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. हझरतुल्लाह जजाई व इब्राहिम झाद्रान यांनीही हात साफ केले.  हझरतुल्लाह जजाई व रहमनुल्लाह गुर्बाझ यांनी ४६ धावांची भागीदारी केली.  गुर्बाजने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आशिया चषक स्पर्धेतील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले, शाहिद आफ्रिदीने २०१४मध्ये बांगलादेशविरुद्ध १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. गुर्बाजने ४५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ८४ धावा केल्या. गुर्बाज व झाद्रान ( ४०) यांनी  ६४ चेंडूंत ९३ धावांची भागीदारी केली.अफगाणिस्तानला अखेरच्या ५ षटकांत ३७ धावा करता आल्या आणि त्यांनी ५ विकेट्स गमावल्या. अफगाणिस्तानने ६ बाद १७५ धावा करता आल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकांत कमबॅक केले.


पथूम निसंका व कुसल मेंडीस यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. नवीन उल हकने ही जोडी तोडली अन् मेंडीस १९ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावांवर माघारी परतला. ९व्या षटकात मुजीब उर रहमानने श्रीलंकेला मोठा धक्का देताना कॅरम बॉलवर निसंकाला बाद केले. ३५ धावा करणाऱ्या निसंकाचा यष्टिंमागे गुर्बाजने सुरेख झेल घेतला. चरिथ असलंका ( ८) पुन्हा अपयशी ठरला अन् नबीने त्याचा त्रिफळा उडवला. मुजीबने दुसरी विकेट घेताना श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाची ( १०) विकेट घेतली. पण, श्रीलंकेने धावांची गती कायम राखली होती. अखेरच्या ५ षटकांत त्यांना ४९ धावा करायच्या होत्या अन् हातात ६ विकेट्स होत्या.


भानुका राजपक्षाने १६व्या षटकात नवीनच्या गोलंदाजीवर १८ धावा चोपल्या. अखेरच्या चेंडूवर राजपक्षाचा सोपा झेल सोडला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत अफगाणिस्तानच्या धावगतीला वेसण घातले, परंतु अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना हा करिष्मा करता आला नाही. १७व्या षटकात दानुष्का गुणतिलकाने रिव्हर्स स्वीप मारून  राशिद खानने टाकलेला चेंडू सीमापार पाठवला. त्यानंतर राशिद व गुणतिलका यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर राशिदने अप्रतिम चेंडू टाकून गुणतिलकाची विकेट घेतली. गुणतिलका २० चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३३ धावांवर बाद झाला. राजपक्षा व वनिंदू हसरंगा यांनी १८व्या षटकात १२ धावा काढून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. राजपक्षा १४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३१ धावांवर बाद झाला, तेव्हा श्रीलंकेला विजयासाठी  २ धावा हव्या होत्या. अखेरच्या षटकात श्रीलंकेने विजय मिळवला. शाहजाह येथील ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हा सर्वोत्तम लक्ष्याचा पाठलाग ठरला. 

Web Title: Asia Cup 2022, SL vs AFG : Sri Lanka have defeated Afghanistan by 4 wickets in the Super 4s of Asia Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.