Asia Cup 2022, Sri Lanka vs Afghanistan : आशिया चषक २०२२च्या पहिल्या सामन्यात श्रीलंका व अफगाणिस्तान हे एकमेकांना भिडले आहेत. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आजचा सामना हा राशिद खानचा १०० वा ट्वेंटी-२० सामना आहे. श्रीलंकेकडून मथिशा पथिराना ( Matheesha Pathirana) पदार्पण करणार आहे. ज्युनियर मलिंगा म्हणून त्याला ओळखले जाते. अफगाणिस्तानने माजी विजेत्या श्रीलंकेची अवस्था वाईट केली आहे.
कुसल मेंडिस व पथुम निसंका ही जोडी सलामीला आली, परंतु फझलहक फारूकीने पाचव्याच चेंडूवर धक्का दिला. मेंडीस २ धावांवर पायचीत झाला. पुढच्याच चेंडूवर चरिथ असलंकालाही ( ०) पायचीत करून फारुकीने श्रीलंकेची अवस्था २ बाद ३ अशी केली. फारुकीने पहिले तीन चेंडू आऊट स्वींगर टाकले आणि अचानक एक चेंडू इनस्वींग टाकून मेंडिसला पायचीत केले. मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्यानंतर DRS घेतला गेला अन् ही विकेट मिळाली.
पुढच्या षटकात नवीन-उल-हकने आणखी एक धक्का देताना पथुम निसंकाला ( ३) झेलबाद केले. चेंडू बॅटची हलकी किनार घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला अन् जोरदार अपील केल्या आणि अम्पायरने बोट वर केलं. श्रीलंकेच्या फलंदाजाने DRS घेतला, परंतु तिसऱ्या अम्पायरने हलक्याशा अल्ट्राएजच्या बळावर बाद हा निर्णय कायम राखला. दोन षटकांत श्रीलंकेची अवस्था ३ बाद ५ धावा अशी झाली.
श्रीलंकेचा संघ - गुणथिलका, निसंका, मेंडिस, असलंका, राजपक्षा, शनाका, हसरंगा, करुणारत्ने, थिक्साना, मधुशंका, पथिरना अफगाणिस्तानचा संघ - झजाई, गुरबाज, झाद्रान, जनत, एन झाद्रान, नबी, रासिद, ओमार्झाई, नवीन, उर रहमान, फारुकी