Asia Cup 2022, Sri Lanka vs Afghanistan : अफगाणिस्तान संघाने पुन्हा एकदा सर्वांना थक्क करणारी कामगिरी करून दाखवली. नाणेफेकीचा कौल विरोधात गेला अन् प्रथम फलंदाजी करावी लागणार याचं दडपण न घेता अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. रहमनुल्लाह गुर्बाझ ( Rahmanullah Gurbaz ) याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. हझरतुल्लाह जजाई व इब्राहिम झाद्रान यांनीही हात साफ केले.
आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने धक्का देताना श्रीलंकेला पराभूत केले होते. आज त्याची परतफेड करण्याची संधी श्रीलंकेला आहे आणि त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुपर ४ मधील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा हा निर्णय आत्मघातकी ठरल्याचे चित्र दिसले. हझरतुल्लाह जजाई व रहमनुल्लाह गुर्बाझ यांनी पहिल्या ५ षटकांत १०च्या सरासरीने धावा करताना ४६ धावांची भागीदारी केली. मदुशंकाने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. पण, गुर्बाजने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आशिया चषक स्पर्धेतील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले, शाहिद आफ्रिदीने २०१४मध्ये बांगलादेशविरुद्ध १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. अफगाणिस्तानने १० षटकांत फलकावर ८३ धावा चढवल्या. श्रीलंकेचे गोलंदाज हतबल दिसत होते.
अफगाणिस्तानच्या फलंदाजांना कशाही धावा मिळत होत्या. श्रीलंकेचे गोलंदाजांचे प्रयत्न अपयशी ठरताना दिसले. सेट झाल्यावर इब्राहिम झाद्रान यानेही हात मोकळे करण्यास सुरुवात केले. गुर्बाझ व झाद्रान यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना १२. २ षटकांत फलकावर तिहेरी आकडा झळकावला. दासून शनाकाने टाकलेल्या १३व्या षटकात या दोघांनी १६ धावा चोपल्या. पुढच्या षटकात झाद्रानने मारलेला खणखणीत षटकार पाहण्यासारखा होता. महिषा थिक्षानाच्या गोलंदाजीवर ८ धावांवर असताना गुर्बाजचा झेल टिपला गेला, परंतु लंकन खेळाडूचा पाय सीमारेषेवर टच झाल्याने त्याला जीवदान मिळाले. त्यानंतर गुर्बाजने ४५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ८४ धावा केल्या. फर्नांडोने ही मोठी विकेट मिळवून दिली. त्यानंतर मदुसनने सेट फलंदाज झाद्रानला बाद केले. गुर्बाज व झाद्रान यांनी ६४ चेंडूंत ९३ धावांची भागीदारी केली.
झाद्रान ४० धावांवर बाद झाला. कर्णधार मोहम्मद नबी ( १) याला थिक्षानाने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. अखेरच्या षटकांत झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात अफगाणिस्तानने विकेट गमावल्या. नजिबुल्लाह झाद्रान १७ धावांवर रन आऊट झाला. अफगाणिस्तानने १५ धावांत ३ फलंदाज गमावले. अफगाणिस्तानला अखेरच्या ५ षटकांत ३७ धावा करता आल्या आणि त्यांनी ५ विकेट्स गमावल्या. अफगाणिस्तानने ६ बाद १७५ धावा केल्या.