Asia Cup 2022, Virat Kohli : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आठव्यांदा आशिया चषक उंचावण्यासाठी दुबईत दाखल झाला आहे. राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत व्ही व्ही एस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे. आशिया चषक स्पर्धेत सर्वांच्या केंद्रस्थानी आहे तो विराट कोहली... मागील दोन-अडीच वर्षांपासून विराट खराब फॉर्माशी झगडतोय आणि आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराटला फॉर्म परत मिळवण्याची संधी आशिया चषक स्पर्धेतून आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. भारतीय संघाच्या सराव सत्रात विराट फुल चार्ज असल्याचे दिसले.. त्याने तुफान फटकेबाजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि विराटचे पुन्हा फॉर्मात येणे हे प्रतिस्पर्धींना धडकी भरवणारे मानले जात आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर विराट कोहली पुन्हा विश्रांतीवर गेला होता. त्यामुळे तो वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघासोबत गेला नाही. आता विश्रांतीनंतर तो कमबॅक करतोय. ३३ वर्षीय विराटने नेट्समध्ये फिरकी गोलंदाजीवर कसून सराव केला. कोहलीने युजवेंद्र चहल व आर अश्विन यांच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटके मारले. आयपीएल २०२२मध्ये विराटने १६ सामन्यांत एकच अर्धशतक झळकावले आणि इंग्लंड दौऱ्यावरील सहा सामन्यांत २० ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. आता २८ ऑगस्टला भारत-पाकिस्तान यांच्या लढतीत विराटचा फॉर्म परत येईल, अशी भारतीय चाहत्यांना आशा आहे.
पाकिस्तानविरुद्धचा हा सामना विराटचा १०० वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना असणार आहे. त्याने ९९ ट्वेंटी-२० सामन्यांत ५०.१२ च्या सरासरीने ३३०८ धावा केल्या आहेत.
भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग, आवेश खान.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल