Asia Cup 2023 : पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमान पाकिस्तानसाठी आजचा सामना होणे महत्त्वाचे आहे, परंतु कोलंबो येथे जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हा सामना न झाल्यास श्रीलंका सरस नेट रन रेटच्या जोरावर फायनलमध्ये भारताविरुद्ध ( १७ सप्टेंबर) खेळेल. भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला आहे. भारताकडून २२८ धावांनी त्यांना हार मानावी लागली आणि भारताविरुद्धची ही सर्वात लाजीरवाणी हार ठरली. पाकिस्तानची ही अवस्था पाहून भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी त्यांचे कान टोचले.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या शतकांच्या जोरावर ३५७ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कुलदीप यादवच्या फिरकीसमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ ३२ षटकांत १२८ धावांवर तंबूत परतला. कुलदीपने ५ विकेट्स घेतल्या. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनीही संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. त्यानंतर विराट-लोकेशने २२३ धावांची विक्रमी भागीदारी करून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली.
स्पोर्ट्स टुडेशी बोलताना गावस्करांनी पाकिस्तानची बोलती बंद केली. ते म्हणाले, क्रिकेटमध्ये जर-तरला वाव नसतो. भारताविरुद्ध पाकिस्तानने अक्षरशः खराब फलंदाजी केली. त्यांची फलंदाजी पाहून पहिल्या सामन्या भारताने २६६ धावांचाही यशस्वी बचाव केला असता, असे वाटतं. पाकिस्तानी नेहमीच चर्चा करतात की भारताकडे एक किंवा दोन खेळाडू आहेत. माझा प्रश्न आहे, की पाकिस्तानच्या संघात असे किती खेळाडू आहेत? विशेषतः फलंदाजी विभागात. त्यांच्याकडे बाबर आजमशिवाय दुसरा कोण आहे?