Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला सुपर ४ मध्ये गाशा गुंडाळावा लागला. शाहीन शाह आफ्रिदी, हॅरीस रौफ, नसीम शाह या जलदगती गोलंदाजांच्या जोरावर पाकिस्तानने आशिया चषकात दमदार सुरूवात केली. पण, रौफ व शाह जखमी झाले अन् पाकिस्तानची कमकुवत बाजू समोर आली. श्रीलंकेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात संघात बदल करून ते मैदानावर उतरले, परंतु चरिथा असलंकाने शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेला थरारक विजय मिळवून दिला. पाकिस्तानला मात्र स्पर्धेबाहेर जावे लागले आणि भारताविरुद्ध जेतेपदाचा सामना खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.
ही खूप साधारण कॅप्टन्सी! गौतम गंभीर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमवर भडकला
श्रीलंकेविरुद्धच्या सुपर ४ मधील महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज ढेपाळले. त्यांचा निम्मा संघ १३० धावांवर माघारी परतला. मोहम्मद रिझवान ( ८६* ) व इफ्तिखार अहमद ( ४७) यांच्या भागीदारीने संघाला ४२ षटकांत ७ बाद २५२ धावांपर्यंत पोहोचवले. DLS मुळे श्रीलंकेसमोर २५२ धावांचेच लक्ष्य होते. कुसल मेंडिस ( ९१), सदीरा समरविक्रमा ( ४८) आणि चरिथ असलंका ( ४९*) यांनी श्रीलंकेला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
या पराभवानंतर बाबर आजम म्हणाला, आम्ही आमच्या सर्वोत्तम गोलंदाजांसह खेळलो. त्यामुळेच शहीनने गोलंदाजी केली, त्यानंतर झमान खानवर विश्वास दाखवला. माझ्यामते श्रीलंकेने आमच्यापेक्षा चांगला क्रिकेट खेळलं आणि त्यामुळेच ते जिंकले. क्षेत्ररक्षणात आम्ही चुका केल्या आणि गोलंदाजीतही सातत्य राखता आलं नाही. मधल्या षटकांत आमचा मारा प्रभावी नव्हता आणि त्यामुळे श्रीलंकेला भागीदारी रचता आली.
पण, मैदानावरून हॉटेलमध्ये गेल्यानंतर बाबरने खेळाडूंची खरडपट्टी काढली. तो संतापलेलाच होता आणि त्याने पाकिस्तानी खेळाडूंना म्हटले की तुम्ही स्वतःला सुपरस्टार समजू नका, स्वतःची कामगिरी सुधारा. वर्ल्ड कप स्पर्धा आहे आणि तुम्ही असंच खेळाल, तर तुम्हाला कुणीच स्टार म्हणणार नाही. श्रीलंकेविरुद्ध एक संघ म्हणून आपण खेळलो नाही आणि कुणीच मनापासून खेळतोय असं जाणवलं नाही.
Web Title: Asia Cup 2023 : Babar Azam got angry after the match against Sri Lanka, he says all players should not think of themselves as superstars, improve their performance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.