लाहोर : आशिया चषकात सुपर ४ चा थरार पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याने सुरू झाला. लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात यजमान पाकिस्ताननेबांगलादेशचा ६३ चेंडू बाकी असताना ७ गडी राखून मोठा विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३८.४ षटकांत सर्वबाद १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ३९.३ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.
बांगलादेशच्या पराभवानंतर संघाचा कर्णधार शकिब अल हसनने नाराजी व्यक्त केली. शाकिबने सांगितले की, सुरुवातीला लवकर विकेट गमावणे आम्हाला महागात पडले. तसेच आम्ही सुरुवातीला विकेट गमावल्या आणि काही सोपे शॉट्स खेळले. अशा खेळपट्टीवर आम्ही पहिल्या १० षटकांमध्ये चार गडी गमावल्याने पाकिस्तानने सामन्यात पकड बनवली. रहीम आणि माझी चांगली भागीदारी होती, पण आम्हाला आणखी ७-८ षटके ती टिकवता आली नाही.
पाकिस्तानी गोलंदाजांवर कौतुकाचा वर्षाव
दारूण पराभवानंतर शाकिब अल हसनने बांगलादेशच्या फलंदाजांना फटकारले. "लाहोरच्या खेळपट्टीवर आमची फलंदाज खूपच खराब झाली. आम्हाला पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे. पाकिस्तान नंबर-१ संघ आहे आणि त्याची ही कारणे आहेत. त्यांच्याकडे तीन वर्ल्ड क्लास गोलंदाज आहेत, ज्यामुळे गोष्टी सहज होतात. आम्ही गोलंदाजीत चांगली कामगिरी केली, पण फलंदाजीत खराब कामगिरी केली", असे शाकीबने स्पष्ट केले. एकूणच बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह यांचे कौतुक केले.
बांगलादेशला आपला पुढचा सामना सुपर ४ मध्ये श्रीलंकेत खेळायचा आहे. श्रीलंकेत खेळण्याचा अनुभव सांगताना शकीब म्हणाला की, तिथली खेळपट्टी संथ आहे, त्यामुळे आम्हाला मदत होते. कोलंबोमध्ये आपला संघ अधिक चांगली कामगिरी करेल, अशी आशा शाकिबने व्यक्त केली.
Web Title: Asia Cup 2023 Bangladesh captain Shakib Al Hasan has said that Shaheen Afridi, Haris Rauf and Naseem Shah are the three world-class bowlers in the Pakistan team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.