Asia Cup 2023, India vs Pakistan : पाकिस्तानी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेचा तिढा अखेर सुटला आहे आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर चार सामने खेळवण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) हायब्रिड मॉडेललाही परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. IND vs PAK ही लढतही श्रीलंकेत होणार आहे. BCCI आणि PCB यांच्यातला वाद मिटल्याने ICC नेही सुटकेचा निश्वास टाकला आहे. पाकिस्ताननेही भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेला येण्याची तयारी दर्शवली आहे.
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानात चार सामने होतील. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे पहिल्या टप्प्यात पाकिस्तानात खेळतील, नंतर दुसऱ्या टप्प्यात श्रीलंकेत भारताविरुद्ध सामन्यांसाठी येतील. श्रीलंकेतच फायनल खेळवण्यात येणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या वादामुळे PCB प्रमुख नजम सेठी यांनी वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची भाषा केली होती.
“परिस्थिती अशी आहे की भारताने येण्यास नकार दिला आहे. आम्हाला आशिया कप सोडावा लागेल. अशा परिस्थितीत आम्ही काय करायला हवं? आम्ही हायब्रिय मॉडेल आयसीसीसमोर मांडला आणि त्यांचा त्याला विरोध नाही. आशिया चषक स्पर्धेत हा मॉडेल कसा काम करतो याची त्यांना प्रतीक्षा आहे. मी यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही पण मला वाटते की ही वस्तुस्थिती आहे,” असे नजम सेठी म्हणाले.