Asia Cup 2023 : २०१९चा वर्ल्ड कप झाला, आता २०२३ चा वर्ल्ड कप तोंडावर आहे, तरीही भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे अद्याप ठरलेलं दिसत नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी चौथ्या क्रमांकासाठी सातत्याने संघात प्रयोग केले, परंतु अजून प्रयोग सुरूच आहेत. मात्र, आशिया चषक स्पर्धेला एक दिवस शिल्लक असताना राहुल द्रविडने ( Rahul Dravid) चौथ्या क्रमांकासाठीच्या प्रयोग शाळेवर स्पष्ट मत व्यक्त केले. श्रेयस अय्यर, लोकेश राहुल व रिषभ पंत हे चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी संघात फिट होते, परंतु दुर्दैवाने तीन महिन्यांच्या कालावधीत तिघंही दुखापतग्रस्त झाले.
Big Update : KL Rahul पहिल्या २ सामन्यांत नाही खेळणार, राहुल द्रविडने दिली माहिती; इशान किशनला संधी
भारतीय संघ आज आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी कोलंबोसाठी रवाना होणआर आहे, परंतु त्याआधीच पुन्हा दुखापतीनं डोकं वर काढल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकेश राहुल पहिल्या दोन सामन्यांत ( पाकिस्तान व नेपाळ) खेळणार नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) लोकेश राहुल थांबणार आहे आणि ४ सप्टेंबरला तो श्रीलंकेत दाखल होईल. मागील काही कालावधीपासून राहुल, श्रेयस अय्यर व रिषभ पंत हे दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहेत. राहुल व अय्यर हे आशिया चषक स्पर्धेतून संघात पुनरागमन करत आहेत. पण, त्यांच्या अनुपस्थितीत चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजाचा प्रश्न निर्माण झाला होता.
सूर्यकुमार यादव याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला खेळवून पाहिले गेले, परंतु ट्वेंटी-२० क्रमवारीत नंबर वन असलेला सूर्या वन डे क्रिकेटमध्ये काही खास करू शकला नाही. पंत अजूनही बराच काळ संघापासून बाहेर राहणार हे स्पष्ट आहे. श्रेयसने कमबॅक केले आहे आमि तो १०० टक्के तंदुरुस्त आहे. आशिया चषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकासाठी तो पहिली पसंत असेल. ''चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू फलंदाजी करू शकेल, यासाठी आम्ही खेळाडूंना रोटेट केले. जेव्हा खेळाडू उपलब्ध नव्हते, तेव्हा दुसऱ्या खेळाडूला संधी दिली आणि हे सातत्याने घडले,''असे द्रविड म्हणाला.
''लोकं आम्ही करत असलेल्या प्रयोगावर सातत्याने चर्चा करतात, परंतु १८-२० महिन्यांपूर्वी मी तुम्हाला सांगितले असते की चौथ्या व पाचव्या क्रमांकावर कोण खेळणार. केएल, पंत आणि अय्यर तेव्हा उपलब्ध होते, दुर्दैवाने हे तिघंही जखमी झाले,''असे द्रविड म्हणाला.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.