India vs Sri Lank Final 2023 : श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने एक सल्ला दिला आहे. कर्णधार रोहित शर्माला शोएब अख्तरने सावध राहण्याचा सल्ला दिला. रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएबने म्हटले की, टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धचा सामना हलक्यात घेऊ नये आणि त्यांना हरवणे म्हणजे सोपे काम नाही.
आशिया चषकाचा अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध खेळण्यापूर्वी टीम इंडियाला सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर अख्तरने भारतीय संघावर टीकास्त्र सोडले. शोएब अख्तरने टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्धचा पराभव लाजिरवाणा असल्याचे म्हटले, तर पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धचा पराभव देखील धक्कादायक होता.
अख्तरचा टीम इंडियाला सल्ला "पाकिस्तानी संघ आशिया चषकातून बाहेर झाला आहे, पण भारत अंतिम फेरीत पोहचला आहे. अशा स्थितीत टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्धचा पराभव हा धोक्याचा इशारा आहे. कारण अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवणे सोपे नसेल", असे अख्तरने नमूद केले. तो त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होता. खरं तर श्रीलंकेविरुद्धच्या मागील सामन्यात भारताच्या कामगिरीवर भाष्य करणाऱ्या शोएब अख्तरला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. एवढेच नाही तर शोएबने आशिया चषक २०२३ मध्ये भारत-पाकिस्तान अंतिम सामना न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
टीम इंडियाचा विजयरथ सुरूच...!टीम इंडियाने आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले आहेत. साखळी फेरीतील पाकिस्तानविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सुपर ४ मध्ये बांगलादेश वगळता पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका या संघांना रोहितसेनेने पराभवाची धूळ चारली. सध्या भारतीय संघ शानदार लयमध्ये आहे.