asia cup 2023 live updates in marathi :रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी पाच मोठे बदल करण्यात आले आहेत. तिलक वर्मा वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. तर सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांना देखील संधी मिळाली आहे. याशिवाय विराट कोहली, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना विश्रांती देण्यात आली आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात तिलक वर्मा (पदार्पण), सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळाली आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. रोहितने यावेळी सांगितले की, होय, हा नक्कीच धाडसी निर्णय आहे. पण या स्पर्धेत आम्हाला कमीवेळा आव्हानाचा पाठलाग करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आमच्यासाठी ही एक संधी असेल. आव्हानात्मक असेल पण संघाला मजबूत करण्यासाठी हे आव्हान स्वीकारले आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, लोकेश राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
आजच्या सामन्यासाठी बांगलादेशच संघ -
शाकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), तन्झीद हसन, अनामूल हक, तौहीद हृदयॉय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, नसुम अहमद, तन्झीद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.
दरम्यान, आजचा सामना आशिया चषकाच्या गुणतालिकेवर प्रभाव टाकणारा नसला तरी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आजचा सामना महत्त्वाचा आहे. कारण बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे, तर भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना खेळवला जाईल.