asia cup 2023, ind vs pak : आशिया चषकात सुपर ४ च्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. भारतीय संघाने २२८ धावांनी मोठा विजय मिळवून यजमानांना पराभवाची धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत २ गडी गमावून ३५६ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ३२ षटकांत १२८ धावा करून सर्वबाद झाला. या सामन्यातील पराभवानंतर एकीकडे भारतीय खेळाडू आनंद साजरा करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे माजी खेळाडू बाबर आझमच्या संघावर टीका करत आहेत.
पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या संघावर निशाणा साधला. विजय आणि पराजय हा खेळाचा भाग असल्याचं आफ्रिदीने म्हटलं आहे. पण, या सामन्यात पाकिस्तानी संघाने लढण्याचा प्रयत्न देखील केला नाही, असेही त्यानं सांगितलं. सोशल मीडियावर एक पोस्ट करत आफ्रिदीने म्हटले, "विजय आणि पराजय हा खेळाचा भाग आहे, पण लढाई केली नाही, जिंकण्याचा इरादा दाखवत नाही हे फार वाईट आहे. मी माझ्या मागील ट्विटमध्ये नेमका काय संदर्भ देत होतो. भारत मैदानावर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये नंबर १ म्हणून खेळला. विराट कोहलीचे अभिनंदन. विराट आणि राहुलनं शानदार शतकं झळकावली. भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू चांगली कामगिरी करतील."
दरम्यान, या सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अंतिम फेरीत भिडण्याची शक्यता आहे. त्यासाठी या दोन्ही संघांना त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. सुपर ४ मध्ये पाकिस्तानचा एकच सामना शिल्लक आहे आणि अंतिम फेरीत जाण्यासाठी हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. तर दुसरीकडे भारताने श्रीलंकेला पराभूत केले तर भारताचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल. त्यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीसाठी लढत होईल.