Pakistan vs India: पाकिस्तान आणि श्रीलंकेत ३० ऑगस्टपासून आशिया कपची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानने नेपाळवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता पाकिस्तानचा दुसरा सामना तुल्यबळ भारतीय संघाशी होणार आहे. २ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात धडाकेबाज असा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. एखादी मोठी स्पर्धा आली की भारतीय चाहते म्हणतात की स्पर्धा हरली तरी चालेल पण पाकिस्तानला हरवाच. असे असताना एका पाकिस्तानी खेळाडूने एक वेगळेच वक्तव्य केले आहे आणि त्याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाला पाकिस्तानचा क्रिकेटर?
"आताचा पाकिस्तानचा संघ हा खूपच समतोल आहे. पाकिस्तानच्या संघात अतिशय निष्णात आणि प्रतिभावान गोलंदाज व फलंदाज आहेत. पाकिस्तानच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये चांगले सलामीवीर तर आहेतच, पण त्यासोबत मधल्या फळीतील दमदार फलंदाजही आहेत. याशिवाय पाकिस्तानात वेगवान आणि स्पिन असे दोनही प्रकारचे गोलंदाज आहेत. सध्याच्या घडीला संघात सारं काही आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता जी टीम आहे त्याच टीमसोबत खेळत राहावे. आपण जरी भारताविरूद्ध हरलो तरीही तु्म्ही स्वत:ची प्लेईंग ११ बदलू नका. सध्या आपण आपल्या सर्वोत्तम संघासोबत खेळत आहोत," असा सल्ला पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने दिला.
पाकिस्तानची विजयी सुरुवात
आशिया चषकात पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली. मुलतान येथे खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळचा 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आता त्यांचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय संघाशी होणार आहे.
बाबरचे सामन्याबाबतचे वक्तव्य
भारता विरुद्धच्या सामन्याबाबत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठे वक्तव्य केले. नेपाळ विरुद्धच्या मोठ्या विजयानंतर तो म्हणाला होता की, हा सामना आपल्या अपेक्षेप्रमाणे झाला. नेपाळ विरुद्धचा सामना ही भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वीची रंगीत तालीम होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक असतात. आम्हाला प्रत्येक सामन्यात 100 टक्के द्यायचे आहेत. या विजयाने आम्हाला आत्मविश्वास दिला.