आशिया चषकात भारतीय सलामीवीरांनी पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. रोहित शर्मा (५६) आणि शुबमन गिल (५८) यांनी अप्रतिम खेळी करत पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह या एकाही त्रिकुटाला सुरूवातीच्या षटकांत बळी घेण्यात यश आले नाही. दरम्यान, पावसाच्या कारणास्तव सामना थांबवण्यात आला असून भारताने २४.१ षटकांपर्यंत २ गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावा केल्या आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओ पोस्ट केला असून पावसाने पाकिस्तानला वाचवले असल्याचे म्हटले आहे.
शोएब अख्तर म्हणाला की, मागील वेळी आम्ही भारताला घेरले होते आणि तेव्हा त्यांना पावसाने वाचवले. यावेळी मात्र पावसाने आम्हाला वाचवले. सामना राखीव दिवशी होईल अशी आशा आहे. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी राखीव दिवस जोडण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस कायम राहिल्यास सामना सोमवारी जिथून थांबला तिथूनच सुरू होईल.
बाबर आझमला डिवचले
पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल बोलताना अख्तरने म्हटले, "पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला मला माहित नाही. मात्र हा निर्णय ऐकताच मी थक्क झालो. दोन दिवस इथे पाऊसही नाही. त्यामुळे पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करायला हवी होती, कारण मागच्या सामन्यात भारताविरूद्ध बाबरच्या संघाला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पाकिस्तान अजूनही फेव्हरेट आहे पण त्यांनी भारताला आयती संधी दिली आहे."
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, शादाब खान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, अलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारीस रौफ.
Web Title: asia cup 2023, IND vs PAK Live updates Shoaib Akhtar says rain saved Pakistan team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.