नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) जवळपास चार वर्षांनी शनिवारी वन डे सामन्यात आमनेसामने होते. मात्र, श्रीलंकेतील पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाऊस खलनायक ठरला आणि सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांना १-१ असे गुण देण्यात आले. पावसामुळे सामन्याची मजा गेली आणि माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. दरम्यान, भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेपाकिस्तानचे नाव न घेता शेजाऱ्यांना टोला लगावला आहे.
इरफान पठाण सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. पठाण भारत-पाक सामन्यात समालोचक म्हणून चाहत्यांचे मनोरंजन करत होता. दरम्यान, पंचांनी सामना रद्द झाल्याचे घोषित केल्यानंतर काही वेळातच पठाणने एक ट्विट केले ज्यामध्ये त्याने लिहिले, "आज शेजाऱ्यांचे टीव्ही वाचले." इरफान पठाणच्या या ट्विटवर पाकिस्तानी चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिक्रिया येत आहे.
तत्पुर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीपासूनच सावध खेळणाऱ्या भारतीय फलंदाजांना पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीने सतावले. शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाहेरचा रस्ता दाखवून आपला इरादा स्पष्ट केला. त्यापाठोपाठ हारिस रौफने सलामीवीर शुबमन गिलला बाद केले. पण, इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या भागीदारीने भारताचा डाव सावरला. अखेर भारताला संपूर्ण ५० षटके देखील खेळता आली नाहीत अन् टीम इंडिया ४८.५ षटकांत २६६ धावांवर सर्वबाद झाली.
भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक (८७) धावा केल्या, तर इशान किशनने (८२) खेळी करून पाकिस्तानसमोर सन्मानजनक आव्हान उभे करण्यात मोलाचा हातभार लावला. किशन-पांड्याने पाचव्या बळीसाठी मोठी भागीदारी नोंदवून सामन्यात रंगत आणली. या दोघांना वगळता एकाही भारतीय फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. सामन्यात वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहिला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर हारिस रौफ आणि नसीम शाह यांना प्रत्येकी ३-३ बळी घेण्यात यश आले.
Web Title: Asia Cup 2023 IND vs PAK match canceled due to rain, neighbors save their TV, says former India player Irfan Pathan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.