Asia Cup 2023, IND vs PAK : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ च्या लढतीत भारताला रविवारी पाकिस्तानचा सामना करायचा आहे. पाकिस्तानने काल सुपर ४ च्या पहिल्या लढतीत बांगलादेशवर ७ विकेट्स राखून विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानचा सामना करण्यासाठी आजपासून सरावाला सुरूवात केली. पण, कोलंबो येथे मुसळधार पाऊस सुरू असल्याने खेळाडूंनी Indoor नेट सत्रात सराव करण्यास प्राधान्य दिले. मात्र, भारताच्या या सराव सत्रात विराट कोहली व रोहित शर्मा यांनी विश्रांती घेतली. दुखापतीतून पूर्णपणे तंदुरूस्त झालेला KL Rahul नेट्समध्ये घाम गाळताना दिसला. त्याच्यासोबत हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर हे ५ खेळाडू होते.
भारत-पाकिस्तान यांच्यातला साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले होते. इशान किशन व हार्दिक पांड्या यांच्या खेळीने भारताला सावरले होते. पण, भारताच्या डावानंतर पावसाने हजेरी लावली अन् मॅच रद्द झाली. नेपाळविरुद्ध भारताने विजय मिळवला, परंतु येथे गोलंदाजांचे अपयश लपले नाही. नेपाळसारख्या संघाने भारताविरुद्ध २३० धावा उभ्या केल्या. पावसाने याही सामन्यात व्यत्यय आणलेला अन् भारतासमोर १४७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. गिल व रोहितने विकेट न गमावता विजय मिळवून दिला.
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर ४ च्या लढतीत भारताची कसोटी असेल हे निश्चित आहे. अशात विराट व रोहितने सराव सत्रातून विश्रांती घेतलेली पाहायला मिळाले. दुखापतीतून सावरणारा लोकेश राहुल नेट्समध्ये चांगली फटकेबाजी करताना दिसला. तर गिल, हार्दिक, श्रेयस, सुर्यकुमार, शार्दूल यांनीही फलंदाजी केली.