IND vs PAK, Asia Cup 2023 : आशिया चषकामध्ये सध्या सुपर-4 फेरी सुरू आहे. या फेरीतील दुसरा सामना कोलंबो येथे श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्यात होणार आहे. तर उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एकदा सामना रंगणार आहे. याआधी पाऊस आणि हवामानाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
सुपर-4 चे सामना
सुपर-4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश आमनेसामने येणार आहेत. हा सामना आज म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोणताही संघ जिंकला तरी त्याची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता आणखी वाढेल. तसेच भारत पाकिस्तान यांच्यात भारताला विजय आवश्यक असणार आहे. या दरम्यान, पाऊस आणि हवामानाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, जे क्रिकेट चाहत्यांना थोडे निराश करू शकते.
हवामान खात्याकडून मिळाली माहिती
आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत पाऊस आणि खराब हवामानामुळे बराच व्यत्यय निर्माण झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज साखळी सामनाही पावसामुळे वाया गेला आणि अनिर्णित राहिला. आता श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील आशिया चषकातील सुपर-4 सामन्याबाबत अपडेट आहे. पावसामुळे या सामन्यावरही परिणाम होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील कॅंडी, डंबुला आणि कोलंबोसह अनेक भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. १७ सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे.
९० टक्के शक्यता
आजच्या श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे, परंतु पाऊस त्यात अडथळा आणू शकतो. कोलंबोमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओही व्हायरल होत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. ९ सप्टेंबरला ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Weather.com च्या अहवालानुसार, 9 सप्टेंबर रोजी दिवसभर गडगडाट होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर दिवसभर पावसाची ७८ ते ९४ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे.