ind vs sl live match । कोलंबो : आज आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. भारतीय संघाने विजयरथ कायम ठेवत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर पाकिस्तानी संघाला पराभवाची धूळ चारून 'आशियाई किंग्ज' श्रीलंकेने फायनलचे तिकिट मिळवले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची दाणादाण झाल्याचे दिसते. कारण केवळ आठ धावांवर श्रीलंकेने ५ गडी गमावले आहेत. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात बळी घेतल्यानंतर मोहम्मद सिराजने ऐतिहासिक कामगिरी करत एकाच षटकात ४ बळी घेतले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून एकाच षटकात चार बळी घेणारा मोहम्मद सिराज पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने पथुम निसंका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दासुन शनाका या पाच फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला.
दरम्यान, भारतीय संघाने सर्वाधिक सातवेळा आशिया चषकाचा किताब उंचावला आहे, तर श्रीलंकेने सहावेळा आशिया चषक जिंकला आहे. गतवर्षी पाकिस्तानला पराभूत करून यजमान श्रीलंकेने दासुन शनाकाच्या नेतृत्वात ही किमया साधली होती. त्यामुळे आज आशियातील दोन यशस्वी संघ पुन्हा एकदा 'आशियाई किंग्ज' कोण हे सिद्ध करण्यासाठी भिडत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भारताने २०१८ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात वन डे फॉरमॅटचा आशिया चषक जिंकला होता.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ -
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसंका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालागे, दुशन हेमांथा, प्रमोद मधुशन, मथिक्ष्णा पथिराना.