Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सामना राखीव दिवशी सुरू करण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला. पावसामुळे आजच्या दुसऱ्या दिवशीही विलंब झाला आणि आता हाती आलेल्या अपडेट्स नुसार सायंकाळी ४.४० वाजल्यापासून सामना पुन्हा सुरू होणार आहे. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एकही षटक कमी केले गेलेले नाही. भारतीय संघ २४.१ षटकांपासून आज पुढे खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे आणि पाकिस्तानला पूर्ण ५० षटकं खेळायची आहे. मात्र, त्यांना एक मोठा धक्का बसला आहे.
काल रोहित आणि शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहित ५६ धावांवर, तर शुबमनही ५८ धावांवर बाद झाला. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला. २४.१ षटकानंतर २ बाद १४२ धावांवर भारताचा खेळ थांबवावा लागला होता. विराट कोहली ( ८) व लोकेश राहुल ( १७) नाबाद आहेत आणि ते मैदानावर उतरणार आहेत. पाकिस्तानसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हॅरीस रौफ ( Haris Rauf) याला सामन्यात खेळता येणार नाही. काल सामन्यादरम्यान त्याच्या डाव्या बाजूला थोड्या वेदना जाणवल्या आणि त्यामुळे त्याला आज गोलंदाजी करण्यासापासून लांब ठेवले गेले आहे. वैद्यकिय टीमने हा निर्णय घेतला आहे. हॅरीसने काल ५ षटकांत २७ धावा देत चांगली गोलंदाजी केली होती.