Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ चा सुपर ४मधील भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यात पावसाचा खेळ सुरू असल्याचे दिसतेय. दोन्ही संघांच्या नजरा अंतिम फेरी गाठण्यावर आहेत आणि पाकिस्तान जिंकला, तर ते फायनलमध्ये पोहोचतील. पण, भारताने हा सामना जिंकला तर संघाची फायनलमध्ये जाण्याची शक्यता आणखी वाढेल. मात्र, सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या मार्गात पावसाचा मोठा अडथळा ठरतोय. प्रथम फलंदाजी करताना भारताने २४.१ षटकांत २ बाद १४७ धावा केल्या आणि त्यानंतर पावसाने जी सुरूवात केलीय, ती राखीव दिवशीही सुरूच आहे. हा सामना रद्द झाला तर पाकिस्तानला फार फरक पडणार नाही, परंतु टीम इंडियाची डोकेदुखी नक्की वाढेल.
विराट, बाबर अन् दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर पोहोचले; कोलंबोहून महत्त्वाचे अपडेट्स आले राखीव दिवशीही पावसाचा खेळ
- 2.35 PM - पाऊस थांबला
- 2.43 PM - कव्हर्स काढण्याचं काम सुरू झालं
- 2.54 PM - पावसाने पुन्हा हजेरी लावली
- 3.03 PM - पाऊस थांबला
- 3.20 PM - पुन्हा पाऊस पडायला लागला
भारताला या सामन्यानंतर बांगलादेश आणि श्रीलंकेशी सामना खेळायचा आहे. टीम इंडियाला बांगलादेशकडून फारसा धोका नाही आणि श्रीलंकेविरुद्धही टीम इंडिया फेव्हरिट असल्याचे बोलले जात आहे. पण सोमवारचा सामना अजून पूर्ण व्हायचा असून भारतासमोर सध्या सर्वात मोठा धोका पाकिस्तानचा आहे. सकाळपासून कोलंबोतील हवामान खराब असून राखीव दिवशीही भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस पडतोय. अशा स्थितीत राखीव दिवशीही चाहत्यांना निकाल न लागण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे पूर्णपणे रद्द झाला, तर भारताला अंतिम फेरी गाठता येईल का?
टीम इंडियाचे भवितव्य त्याच्यांच हातात आहे आणि अंतिम फेरीचा सर्वात मोठा दावेदार असल्याचे बोलले जात आहे. राखीव दिवसही पावसामुळे वाहून गेला तर भारत आणि पाकिस्तान या दोघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यासह पाकिस्तान ३ गुणांसह सुपर ४ टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचेल. बांगलादेशविरुद्ध त्यांनी विजय मिळवला आहे. श्रीलंकेनेही बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला असून २ गुण कमावले आहेत. अशा परिस्थितीत भारताला बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धचे पुढील दोन सामने जिंकावे लागतील आणि ५ गुणांसह ते फायनलमध्ये जातील.