India Vs Pakistan Asia Cup 2023 Venue Update: आशिया कप संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित आशिया चषक सामना श्रीलंकेत होणार आहे कारण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी बुधवारी याला दुजोरा दिला. धुमाळ सध्या ICCच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी डर्बनमध्ये आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे प्रमुख झका अश्रफ यांची गुरुवारच्या ICC बोर्डाच्या बैठकीपूर्वी आशिया चषकाचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी बैठक झाल्याची त्यांनी पुष्टी केली.
भारत-पाकिस्तान सामने पाकिस्तानबाहेरच!
धुमाळ यांनी डरबन येथून सांगितले की, "जय शाह यांनी पीसीबी प्रमुख झका अश्रफ यांची भेट घेतली आणि आशिया कपचे वेळापत्रक निश्चित झाले आहे." आधी जे बोलले जात होते त्याच्याशी हे सुसंगत आहे. पाकिस्तानमध्ये साखळी टप्प्यातील चार सामने आणि त्यानंतर श्रीलंकेत नऊ सामने होतील. त्यात भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याचा समावेश आहे. दोन्ही संघ अंतिम सामना खेळले तर तेही श्रीलंकेतच होईल. भारतीय संघ पाकिस्तानला जाणार असल्याच्या पाकिस्तानी मीडियामध्ये बातम्या येत होत्या. पण या अफवा फेटाळून लावण्यात आले. पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांच्या हवाल्याने अशा बातम्या येत होत्या.
चार सामने पाकिस्तानात!
आशिया चषक 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार असून 6 संघांमध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. त्यात फायनलचाही समावेश आहे. हा सामनादेखील कदाचित श्रीलंकेत खेळवला जाईल. या स्पर्धेत पाकिस्तानात फक्त 4 सामने खेळण्यात येणार आहे, तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. तसे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेतील डांबुला येथे होणार आहे. त्याचवेळी पाकिस्तान आपला एकमेव सामना घरच्या मैदानावर नेपाळविरुद्ध खेळणार आहे. याशिवाय अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान हे सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत.
यावेळी आशिया चषक ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. आशिया कप 2023 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ सहभागी होणार आहेत. याच गटात भारत, नेपाळ आणि पाकिस्तानचा समावेश आहे. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात राहतील. दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ सुपर 4 मध्ये पोहोचतील. त्यानंतर सुपर-4 मध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये विजेतेपदाचा सामना खेळला जाईल.