Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अंतिम फेरीचे तिकिट मिळवण्याची जबाबदारी आता गोलंदाजांवर आहे. कर्णधार रोहित शर्माने चेंडू सोपवताच जसप्रीत बुमराहने श्रीलंकेच्या दोन फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवून भारतीय चाहत्यांना खुश केले. पथुम निसांका (६) आणि आता कुसल मेंडिसला (१५) आपल्या जाळ्यात फसवून बूम बूमने श्रीलंकेला दुसरा मोठा धक्का दिला. तर, मोहम्मद सिराजने दिमुथ करुणारत्नेला (२) बाद करून श्रीलंकेचा तिसरा गडी बाद केला.
आज श्रीलंकेचा युवा गोलंदाज २० वर्षीय दुनिथ वेल्लालागे (५-४०) आणि पार्ट टाईम गोलंदाज चरिथ असालंका (४-१८) यांच्या फिरकीची जादू चालली. वेल्लालागेने रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल यांची विकेट मिळवली. अक्षर पटेलने १०व्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत उपयुक्त २७ धावा जोडल्याने भारताने दोनशेचा पल्ला पार केला. फिरकीला पोषक खेळपट्टीवर रोहित शर्मा (५३) व शुबमन गिल (१९) यांनी ८० धावांची सलामी दिली. पण, वेल्लालागेने झटपट ५ बळी घेतले. लोकेश राहुल (३९) आणि इशान किशन (३३) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी आज कमाल केली.
अक्षर पटेलने २६ धावा केल्या. भारताचा संपूर्ण संघ ४९.१ षटकांत २१३ धावांवर तंबूत परतला. प्रथमच भारताचे १० फलंदाज स्पिनर्सने बाद केले. महिषा थीक्षाणाने शेवटची विकेट घेतली, वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचे १० फलंदाज फिरकीपटूंनी माघारी पाठवले. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या जसप्रीतने श्रीलंकेला धक्का दिला. सलामीवीर पथूम निसंका ६ धावांवर बाद झाला आणि लोकेश राहुलने यष्टिंमागे अफलातून झेल टिपला. पण, त्याआधीच्या षटकात ओल्या खेळपट्टीवर जसप्रीतचा पाय मुरगळला होता. हा प्रसंग पाहून विराट, रोहित, लोकेश सर्वांचं काही क्षणापूरते टेंशन वाढले होते. पण, जसप्रीत पूर्णपणे बरा असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ - दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चॅरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, डुनिथ वेललेज, महीश थीक्षाना, कासुन राजिथा, मथीशा पथिराना.