Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ मधील दुसऱ्या सामन्यात भारताला चांगल्या सुरुवातीनंतर ३ धक्के बसले. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८० धावांची सलामी दिली, परंतु २० वर्षीय गोलंदाज दुनित वेलालागेने श्रीलंकेला ३ यश मिळवून दिले. त्याने शुबमन ( १९), विराट कोहली ( ३) आणि रोहित शर्मा ( ५३) यांना अप्रतिम चेंडूवर गंडवले. वेलालागेने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ५-१-१२-३ अशी उल्लेखनीय कामगिरी केली.
रोहित शर्मा - विराट कोहलीने मोडला ३२ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; हिटमॅनचा विक्रमांचा पाऊस
१५ तासांत भारतीय संघ दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शार्दूल ठाकूरच्या जागी अक्षर पटेल याला संधी दिली गेली. श्रीलंकेने सलग १३ वन डे सामने जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे आणि त्यांची ही विजयी मालिका खंडीत करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानावर उतरला. शुबमन आणि रोहित यांनी चांगली सुरुवात करून दिली. १२व्या षटकात श्रीलंकेने २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागेला आणले अन् त्याने फिरकीवर शुबमनचा ( १९) त्रिफळा उडवला. रोहितसह त्याची ८० धावांची भागीदारी संपुष्टात आली.
रोहितने षटकाराने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वेलालागेने त्याच्या पुढच्या षटकात विराटला ( ३) फसवले अन् झेलबाद केले. वेलालागेने आता तर भारतीय कर्णधार रोहित शर्माला चकवले. रोहितचा ( ५३) त्रिफळा त्याने उडवला. १२ वन डे सामन्यांचा अनुभव असलेल्या वेलालागेची कामगिरी पाहून सारेच चकित झाले.