Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेल्लालागे ( Dunith Wellalage) आणि पार्ट टाईम गोलंदाज चरिथ असालंका यांच्या फिरकीची जादू आज चालली. वेल्लालागेने आजचा दिवस संस्मरणीय बनवताना रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल यांची विकेट मिळवली. त्याने १० षटकांत ४० धावांत ५ विकेट्स घेतल्या. चरिथनेही ४ विकेट्स घेत त्याला साथ दिली. अक्षर पटेलने १०व्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत उपयुक्त २७ धावा जोडल्या.
कोण आहे दुनिथ वेल्लालागे? ज्याच्यासमोर भारताच्या दिग्गजांनी टेकले गुडघे, पठ्ठ्याच्या नावावर आहे शतक
रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८० धावांची सलामी दिल्यानंतर वेल्लालागेने वर्चस्व गाजवले. त्याने त्याच्या पहिल्या षटकात शुबमनचा ( १९) त्रिफळा उडवला, दुसऱ्या षटकात विराटला ( ३) झेलबाद केले अन् तिसऱ्या षटकात रोहितला ( ५३) त्रिफळाचीत केले. लोकेश राहुल व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. श्रीलंकेच्या फिरकी माऱ्याचा दोघांनी संयमाने सामना केला. पण, लोकेशचा संयम वेल्लालागेने तोडला. इशानसह ८९ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करणारा लोकेश ( ३९) कॉट अँड बोल्ड झाला.
इशानने चांगला खेळ केला, परंतु ६१ चेंडूंतील ३३ धावांची त्याची खेळी असालंकाने संपुष्टात आणली. त्यानंतर असालंकाने रवींद्र जडेजा ( ४), जसप्रीत बुमराह ( ५) व कुलदीप यादव ( ०) यांना माघारी पाठवले. पावसामुळे खेळ थांबलेला तेव्हा भारताने ४७ षटकांत ९ बाद १९७ धावा केल्या होत्या. ७.०५ वाजता खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर ७.१५ ला सामना सुरू होणार असल्याचे जाहीर केले गेले. अक्षरने धावा वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो २६ धावांवर झेलबाद झाला. भारताचा संपूर्ण संघ ४९.१ षटकांत २१३ धावांवर तंबूत परतला. प्रथमच भारताचे १० फलंदाज स्पिनर्सने बाद केले. महिषा थीक्षाणाने शेवटची विकेट घेतली.