Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर ४ मधील लढतीत यजमान श्रीलंकेवर विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. श्रीलंकेची सलग १३ सामन्यांची अपराजित मालिका आज भारतामुळे खंडित झाली अन् पाकिस्तानला उभारी मिळाली. श्रीलंकेने ही मॅच जिंकली असती, तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता बळावली असती, परंतु आता त्यांना एक संधी मिळाली आहे. १४ तारखेचा त्यांचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे आणि तो जिंकून ते १७ तारखेला भारताला फायलनमध्ये भिडू शकतात. कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या.
डोळ्यांत साठवून ठेवावा असा क्षण! रोहित शर्माचा अविश्वसनीय कॅच अन् विराटची 'जादू की झप्पी'
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेला जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी धक्के दिले. पथूम निसंका ( ६), कुसल मेंडिस ( १५) आणि दिमुथ करुणारत्ने ( २) पहिल्या १० षटकांत माघारी परतले. चरिथ असालंका आणि सदीरा समरविक्रमा यांनी डाव सावरला होता. पण, कुलदीपने सलग दोन षटकांत सदीरा ( १७) व असालंका ( २२) यांना माघारी पाठवले. रवींद्र जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाला ( ९) बाद करून मोठा धक्का दिला. आशिया चषकात सर्वाधिक २३ विकेट्सचा विक्रम जडेजाने नोंदवला अन् इरफान पठाणला ( २२) मागे टाकले. श्रीलंकेचे ६ फलंदाज ९९ धावांवर तंबूत परतले.
धनंजया डी सिल्वा आणि दुनिथ वेल्लालागे यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला. ५ विकेट्स घेणाऱ्या वेल्लालागेचे खणखणीत फटके पाहून भारतीय गोलंदाज अचंबित झाले. वन डे सामन्यात ५ विकेट्स व ३०+ धावा करणारा वेल्लालागे हा तिसरा युवा खेळाडू ठरला. अब्दुल रझ्झाक ( २० वर्ष व ५० दिवस वि. भारत, २०००) आणि शाहिद आफ्रिदी ( २० वर्ष व २४० दिवस वि. इंग्लंड, २०००) यांनी आधी हा पराक्रम केला आहे. ७८ चेंडूंत ५७ धावांची गरज असताना पावसाची चाहूल लागली अन् वेल्लालागेने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. पण, दुसऱ्या बाजूने धनंजयाने ४१ धावांवर विकेट टाकली. जडेजाने ६३ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. शेवटच्या १० षटकांत श्रीलंकेला ४४ धावा हव्या होत्या, तर त्यांच्याकडे केवळ ३ विकेट्स शिल्लक होत्या. हार्दिकने ४१ व्या षटकात थीक्षणाला ( २) माघारी पाठवून श्रीलंकेला मोठा धक्का दिला. सूर्यकुमारने मिड ऑनला अप्रतिम झेल घेतला. पुढील जबाबदारी कुलदीपने स्वीकारली अन् त्याने रंजिथाची दांडी गुल केली. त्यापाठोपाठ पथिराणाचा त्रिफळा उडवून त्याने श्रीलंकेचा डाव १७२ धावांवर गुंडाळला. भारताने ४१ धावांनी सामना जिंकला. ५ विकेट्स घेणारा वेल्लालागे ४२ धावांवर नाबाद राहिला.