Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर ४ मधील लढतीत यजमान श्रीलंकेवर कुरघोडी केल्याचे पाहायला मिळतेय. जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. भारतीयांचे क्षेत्ररक्षणही आज अप्रतिम झाले. लोकेश राहुलची स्टम्पिंग अन् प्रसंगावधान राखून घेतलेला झेल अप्रतिम होताच. पण, रोहित शर्माने टिपलेला शार्प कॅच भाव खावून गेला. त्यानंतर विराट कोहलीने त्याला दिलेली जादू की झप्पी हा चाहत्यांसाठी डोळ्यांत साठवून ठेवणारा क्षण ठरला.
जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्के दिले. पथूम निसंका ( ६), कुसल मेंडिस ( १५) आणि दिमुथ करुणारत्ने ( २) पहिल्या १० षटकांत माघारी परतले. चरिथ असालंका आणि सदीरा समरविक्रमा यांची सेट झालेली भागीदारी तोडण्याची संधी चालून आली होती, परंतु इशान किशनने असालंकाचा झेल टाकला. पण, पुढच्या षटकात कुलदीपने धक्का दिला. पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात सदीरा ( १७) यष्टिचीत झाला. कुलदीपने आणखी एक धक्का दिला अन् असालंकाला ( २२) माघारी पाठवून श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. रवींद्र जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाला ( ९) बाद करून मोठा धक्का दिला. रोहितने स्लीपमध्ये अप्रतिम झेल घेतला अन् विराटने त्याला मिठी मारली.
आशिया चषकात सर्वाधिक २३ विकेट्सचा विक्रम जडेजाने नोंदवला अन् इरफान पठाणला ( २२) मागे टाकले. श्रीलंकेचे ६ फलंदाज ९९ धावांवर तंबूत परतले. तत्पूर्वी, २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेल्लालागे (५-४०) आणि चरिथ असालंका ( ४-१८) यांच्या फिरकीने भारताची अवस्था बिकट केली. महीश थीक्षणाने शेवटची विकेट घेतली. वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचे दहा फलंदाज फिरकीपटूंना विकेट देऊन माघारी परतले. रोहित शर्मा ( ५३), लोकेश राहुल ( ३९) व इशान किशन ( ३३) यांनी चांगला खेळ केला. अक्षर पटेलने २६ धावा करून महत्त्वाची भर घातली. भारताचा संपूर्ण संघ ४९.१ षटकांत २१३ धावांवर तंबूत परतला.