Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात KL Rahul ची निवड करून निवड समिती अडचणीत येताना दिसत आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी लोकेश राहुल तंदुरुस्त असल्याचे सांगून आगरकरने त्याला निगल असल्याचे मान्य केले. पण,त्याच्या आधीच्या दुखापतीशी काही संबंध नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. आशिया चषकासाठी भारतीय संघाचा ६ दिवसीय कॅम्प बंगळुरूत सुरू आहे आणि तेथे नेट्समध्ये सर्व कसून सराव करत आहेत. केएल राहुलनेही १ तास फलंदाजी केली, परंतु तरीही तो पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला होणाऱ्या लढतीत खेळण्याची शक्यता कमीच आहे.
राहुल सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याचा अंदाज आगरकरनेही व्यक्त केला होता. पण, त्याने आशाही व्यक्त केली होती की, राहुल वेळेत बरा होईल. पण, काल नेट्समध्ये त्याने १ तासच फलंदाजी केली. पण, त्याच्यावर यष्टिरक्षणाचीही जबाबदारी आहे आणि ते पाहता तो अडखळताना दिसतोय. ''लोकेश राहुलला निगल झाला आहे आणि तो पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे,''असे सूत्रांनी सांगितले.
"राहुल निगलमधून बरा होत असल्याने तो कदाचित पहिला सामना चुकवू शकतो आणि नेपाळविरुद्धच्या सामन्यापासून त्याच्या मोहिमेची सुरुवात करू शकतो. तो नेटमध्ये फलंदाजी करत आहे आणि तंदुरुस्त होण्याची चिन्हे दाखवत आहे, परंतु यष्टिंमागे त्याला त्रास होतोय. तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. वैद्यकीय संघ त्याच्यावर काम करत आहे. अजून हातात वेळ आहे. हे त्याच्या बरे होण्यावर अवलंबून असेल आणि आम्हाला आशा आहे की तो लवकरच बरा होईल," असे सूत्र पुढे म्हणाले.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा; राखीव खेळाडू - संजू सॅमसन